ब्रम्हपुरी जिल्हा निर्मिती करण्यात यावी यासाठी ब्रम्हपुरीकरांनी आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या तीन जुलैला ब्रम्हपुरी तालुका बंद व धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधी माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने दि. २६ ला त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व सदर निवेदन दिले. भेटीदरम्यान ब्रम्हपुरी जिल्हा निर्मिती हे आपले ध्येय असून मी आता येथील रहिवासी आहे. माझे व्होटिंग कार्डदेखील ब्रम्हपुरी येथील आहे. त्यामुळे चिमूर येथील अप्पर जिल्हा कार्यालयाला विरोध कायम राहील असे त्यांनी समितीला आश्वस्त केले.
तालुक्याला लाभलेल्या विविध उपलब्धता व भौगोलिक संपन्नता लक्षात घेता मागील चाळीस वर्षांपासून असलेली ब्रम्हपुरी जिल्ह्याची मागणी शासनाने पूर्ण करावी याकरिता दि. २ जूनला महामोर्चा व रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष करत चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे होणार असल्याचे जाहीर केले. याविरोधात सर्वपक्षीय ब्रम्हपुरीकर आक्रमक झाले असून येत्या तीन जुलैला ब्रम्हपुरी तालुका बंद व धरणे आंदोलनाचा इशारा जिल्हा निर्माण संघर्ष समितीने दिला आहे.