काही माणसे स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगण्यासाठीच जन्म घेतात. त्यापैकीच एक म्हणजे आमचे मित्र डॉ. ज्ञानेश्वर गरड. ज्ञानेश्वरचे वडील त्याच्या बालपणीच वारले आणि या मायलेकाचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. आई शांताईने काबाडकष्ट करून मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले आणि जिद्दी मुलाने ते पूर्ण करून दाखविले. या कुटुंबाचा संघर्षाचा इतिहास थक्क करून सोडणारा आहे. जीवन जगताना अत्यंत कटू अनुभव आले तरी अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेल्या समाजाला आपल्या ज्ञानप्रकाशात वाट दाखवणारी ज्ञानेश्वर माऊली तेराव्या शतकात होऊन गेली. योगायोगाने माझ्या मित्राचे नाव ज्ञानेश्वर आहे आणि त्यानेही समाजाचे कटू अनुभव पचवत आपल्या रूग्णसेवेने सर्वांना सुखद अनुभूती दिली आहे. त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच !
डॉ. गरड यांचा मूळ पिंड सेवा करण्याचा आहे. रुग्णसेवा हा डॉक्टरचा व्यवसाय असतो परंतु डॉ. गरड यांना त्याला आपले व्रत मानले आहे. करोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत रुग्णसेवा दिली. परंतु हा अवलिया येथेच थांबला नाही. गरजूंना रक्तदान, क्षय, एड्स अशा रोगांबाबत जनजागृती , गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार , निराधारांना कपडे वाटप, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम ते राबवत असतात. मनभा, सोहोळ आणि शेलूवाडा या ठिकाणी त्यांनी मंदिरांचा जिर्णोध्दार करून गावकऱ्यांची मने जिंकली.
डॉ. ज्ञानेश्वर हे केवळ सेवाभावी नाहीत. त्यांचा आणखी एक सद्गुण ज्यामुळे मी त्यांच्याकडे आकर्षिला गेलो तो म्हणजे सर्वधर्मसमभाव ! इतर धर्मीयाविषयी त्यांच्या मनात असलेला जिव्हाळा हा एक दुर्मिळ गुण ! त्यामुळेच आम्ही एकमेकांचे जीवलग मित्र झालो. काही वर्षांपूर्वी त्यांनी कारंजा येथील बाबासाहेब सभागृहात आयोजित केलेला सर्वधर्मीय विवाह सोहळा खूप गाजला होता. त्यामध्ये त्यांनी तब्बल ११०० जोडप्यांचे विवाह आपापल्या धार्मिक विधींप्रमाणे लावून भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावली. शासनाची मदत न घेता असे उपक्रम राबविणे म्हणजे पोरखेळ नव्हे.
असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेणारा माझा मित्र निर्मोही आहे. १५ दिवसातून किमान एकदा तरी भेट झाल्याशिवाय आम्हाला करमत नाही. आपल्या आई विषयी कृतज्ञता जपत डॉ. गरड यांनी त्यांच्या दवाखान्याचे नाव शांताई क्लिनिक असे ठेवले आहे. हा लेख वाचून गरीबांसाठी आधारवड असलेल्या शांताई क्लिनीकला भेट देण्याची आपली इच्छा झाल्यास हा त्यांच्या कार्याचा गुणगौरव करणारा लेख सार्थकी लागला असे म्हणावे लागेल.