जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ. सतत सुख किंवा दुःख असे क्वचितच आढळते. जेथे जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे, प्रगती पथावर राहावे. जन्म आणि मृत्यूनंतर पर्यंतचा प्रवास म्हणजेच जीवन. कधी स्वतःला फोन लावला तर तो व्यस्त दाखवेल. आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र व्यस्त आहात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून ईश्वराला साध्य करण्याचा सल्ला देतात.
क्या किया क्या किया क्या किया रे ।
तूने जीवन गमा दिया क्या किया रे ।
जिसे पाना था उसको तो खो दिया रे ।।धृ।।
लाखो जन्मानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला. तो दुर्लभ आहे. आपण मनुष्य जन्मात येऊन काय केल? काहीच केले नाही. तो आपण खरोखरच वाया घालवतो आहे. आपण पैसेच नाही तर भौतिक सुखाच्या गरजांच्या पुर्तते सोबतच नामस्मरण, साधना, आराधना, प्रार्थना हे सुद्धा करायला हवे. पशु, पक्षी यांचे देहात नामस्मरण शक्य नाही. मनुष्य देहातच परमेश्वर प्राप्ती करता येते. ईश्वर प्राप्त करण्यासाठी निस्वार्थ भावाने प्रेममयी भक्ती करावी लागेल. निश्चितच भगवान प्राप्त होईल. म्हणूनच भक्ती करा, सत्संग करा, मोहाचा त्याग करा, रोज प्रार्थना करा, कोणतेही कार्य करताना एकाग्रता व पवित्रता मनात ठेवा. तुकडोजी महाराज म्हणतात की, "हरीच्या नामस्मरणाने हरीचे तेज ये अंगी । मनाची दुष्टता नासे रमे मनही हरी रंगी ।।" पैसा मिळवून पोटाची भूक भागविण्यासाठी जगणे आहे पण संसार करून परमार्थाकरिता वेळ देणे गरजेचे आहे.
अमृत को छोडा पिता है शराब रे ।
भगवान के नाम मुख मोड दिया।
तूने जीवन गमा दिया क्या किया रे ।।१।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, या कलियुगातील अमृत म्हणजे सात्त्विक आहार, गायीचे शुद्ध तूप आणि दुध हे अमृतच आहे. गरिबांकरिता ताक पृथ्वीवरील अमृतच म्हटले आहे. सात्त्विक आहार घेतल्याने मनुष्य सत्वगुणी बनतो. हे अमृत सोडून तू दारु प्यायला लागला आहेस. दारु शरीराला घातक आहे. दारुमुळे तुझ्या मेंदूवर मानसिक ताण पडतो. दारु पिणे शरीरास चांगले असते हे कितपत खरे आहे? हे माझे मते खोटे आहे. दारुच्या आहारी गेला आणि लिव्हर निकामी झालं. दारुने नुसता हाडाचा सापळा झालास. तू वाईट व्यसनाचे मागे लागून मृत्यूला का बोलावतोस. "देहाचा पिंजरा झाला जुना । जन्म मिळेना पुन्हा पुन्हा ।।" ईश्वराचे नाम घ्यायला तुझे मुख तयार नाही कारण तू व्यसनात गुंग झाला आहे. तुझ्या मनाला जर ईश्वराचे ध्यान नित्य सर्वकाळ लागले पाहिजे. एवढे गोड नाम आहे की, ते सतत तुला घ्यावेसे वाटेल. महाराज म्हणतात, "मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे ।" तु नाम मुखाने न घेता मनुष्य जीवनाचे कसे सार्थक होईल. जीवनात आपल्या हाती काहीच नसते पण कुठल्याही गोष्टीचा परिणाम आपल्या हाती नसतो पण आपल्या हाती मेहनत करणे, नाम घेणे तर तुझ्या हाती आहे. "राम नाम ज्याचे मुखी । तो नर धन्य तिन्ही लोकी ।।" म्हणूनच हे जीवन अनमोल आहे. तू वाया घालवू नकोस.
विषयोंके फंदोमें बांधा गया तू ।
संत समागम को भूल गया ।
तूने जीवन गमा दिया क्या किया रे ।।२।।
विषय वासनामुळे भक्ताला परमार्थाच्या मार्गावर चालताना उन्नती करता येत नाही. वासना ही एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असणे होय. वासना कोणत्याही स्वरुपाची असू शकते. विषय वासना ही दोन प्रकारांनी निर्माण होते. एक प्रत्यक्ष प्रेरणेने निर्माण होणारी व दुसरी परोक्ष प्रेरणेने निर्माण होणारी असते. ही वासना संपत्ती, घरदार, कुटुंब अगदी कशावर ही होऊ शकते. जशी वासना होईल तसा जन्म मनुष्य प्राण्याला घ्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात, "वासनेच्या संगे जन्म लागे घेणे" आपला जन्मच मुळात वासनेतून होत असतो. राष्ट्रसंत म्हणतात की, "वासने तुझ भोवती, किती जन्म घालावे आम्ही ।" ही वासना नाहीशी व्हावी वाटत असेल तर संत समागम साधायला हवे. या विषयाचे आहारी गेल्यामुळे संत समागमला तू विसरलास. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, "संत समागम साधा । संत समागम साधा । गडे हो ।।" संत संगतीमुळे मोह, माया, काम, क्रोध नाहिसे होतात. या विषय वासनेमुळे तू संत समागम करण्यास भुलला आहेस. आपली वासना जर शिल्लक असेल तर त्याला मृत्यू म्हणतात. आपली वासना काहीच शिल्लक नाही त्याला मोक्ष म्हणतात. वासना शिल्लक असणे म्हणजे परत जन्म घेणे. मोक्ष म्हणजे पुन्हा जन्म घेणे नाही. तू संताला शरण जा. संत समागम साधावा. तू तुझे जीवन व्यर्थ वाया घालवू नकोस. मनुष्याने प्रत्येक दिवशी ईश्वराचे उपकाराचे स्मरण करावे. राष्ट्रसंत म्हणतात की, "अगर तू मोक्ष चाहता है । भजन कर सत्य पाने का ।।"
पैसो के खातिर करता मिलावट ।
निति और नेकी को छोड दिया ।
तूने जीवन गमा दिया क्या किया रे ।।३।।
पैशासाठी गव्हामध्ये रेती तसेच दुधामध्ये पाणी मिळवून भेसळ करतोस आणि लोकांना फसवितोस. तुला पैसा हाच महत्त्वाचा वाटतो. तू नितीने वागणे सोडून दिलेस. निती म्हणजे नियम, वचन, सत्यप्रवृत्ती, सदाचरण, सारासार विवेक, सत्य इत्यादी. हे गुण अंतिम श्रेयाकडे नेणारा मार्ग इत्यादी गोष्टी निती शिकवते. तसेच नेकी म्हणजे दुसऱ्याचे भले करणे, उत्तम व्यवहार, सज्जनता, उपकार, हित होय. अंतकरणाचा खरेपणा, शुद्धपणा, प्रामाणिकपणा, सत्यता, सद्वर्तन, सरळमार्ग, व्यवहार, आचरण होय. हे निती व नेकी तू सोडून दिलीस. तू पैशासाठी भेसळ, मिलावट करतोस. निती, नेकी (ईमानदारी) सोडून दिलीस. हा मनुष्य जन्म भाग्याने लाभला आहेस. तू वाया घालवू नकोस. चांगले विचार आत्मसात कर आणि वाईट विचाराचा त्याग कर.
तन के घमंड से होगी फजीती ।
तुकड्या कहे सब भूल गया ।
तूने जीवन गमा दिया क्या किया रे ।।४।।
घमंड म्हणजे अहंकार, अहं, अभिमान. यामुळे शरीर आणि बुद्धी या दोन्ही नष्ट होते. इंद्राने घनघोर पाऊस पाडला. या इंद्राचा अहंकार तोडण्यासाठी भगवान कृष्णाने आपल्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला. अहंकार केल्याने आपलीच फजीती होते. "शरीर मिट्टीका साॕसे उधार है । घमंड किस बात का । हम सब तो सिर्फ किरदार है ।।" शरीर नश्वर आहे. आत्मा अमर आहे. अहंकार करु नकोस. आत्मा या शरीरातून कधी निघून जाईल याचा भरवसा नाही. राष्ट्रसंत म्हणतात "मत करना अभिमान देह का । यह काया ना रही किसकी । जब उड जावे जान ।।" राष्ट्रसंत म्हणतात की, तू मनुष्य म्हणून जन्माला आलास आणि ईश्वराला भुललास. मनुष्य दुःखी असला तर परमेश्वराची आठवण करतो पण सुख मिळत असेल तर तो ईश्वराला भुलून जातो. सुख किंवा दुःख असो त्या ईश्वराला भूलू नकोस. ईश्वर बाहेर नसून तो आपल्या आत मध्ये आहे. ईश्वर आत्मरुपात आपल्या शरीरात वास करुन असतो. आपले शरीर हे एक देवाचे मंदिरच आहे. त्या देवाचं नामस्मरण करा. हा अनमोल नरदेह निघून गेला तर काय करशिल. राष्ट्रसंत म्हणतात.
जाईल हा नरदेह गड्या ।
मग काय पुढे करशिल मजा?।।
बोधः- मनुष्य नेहमी देहाचे कौतुक करतो. मी म्हणजे देह अशी कल्पना दृढ असल्याने त्याला हवं तसं झालं की तो सुखी होतो. ईश्वराने आपल्या शरीरात दैवी शक्ती दिली. तिचा उपभोग नामस्मरण करण्यास उपयोगी व्हावा. आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्याच्या अंती समाधानी असावे. अपूर्ण इच्छा, मृत्यूचे भय इत्यादी काही नसावे. मनात कुठलीही तृष्णा नसावी. समाधान आणि आनंद हेच भगवत्प्राप्तीचे लक्षण आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात.
याजसाठी केला होता आट्टाहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ।।
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....