कारंजा : रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक महेश भवन येथे प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित कारंजा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा १२:०० वाजता सुरू होऊन रीतसर संपन्न झाली.
सभेच्या सुरूवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाचे बँकेतील कर्मचारी,अल्पबचत प्रतिनिधी तसेच उपस्थित मान्यवर भाग धारकांच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
त्यानंतर बँकेचे पूर्व अध्यक्ष यांचे प्रास्ताविक भाषण झाले. त्यामध्ये त्यांनी सर्व साधारण सभेचे महत्व सर्व उपस्थित भागधारक,ठेवीदार,खातेदार व कर्मचारीवृंद यांना सांगितले.संस्थेच्या अहवाला विषयी माहिती देऊन संस्थेच्या विकासाबाबत आतापर्यंत राबवीलेल्या विविध योजना आणि भविष्यातील पतसंस्थेचे होऊ घातलेल्या प्रस्तावित योजनाची सविस्तर माहिती या सर्व साधारण सभेत सर्वांना दिली. तसेच आपल्या पतसंस्थेची सद्यस्थिती काय आहे ? याबद्दल सर्वांना अवगत केले.
यानंतर बँकेचा आजपर्यंतचा उलाढालीचा लेखाजोखा सर्वांसमोर वाचण्यात आला. त्यामध्ये कर्जवाटप,ठेवी,जमा रक्कम इत्यादीचा उल्लेख आकडेवारीनुसार करण्यात आला.
यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष आकाश भास्करराव कऱ्हे यांनी सर्वांना धन्यवाद देत बँकेच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध आहोत. "भविष्यात सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवून सर्व व्यवहार सुरळीत ठेऊ असे आश्वासन त्यांनी दिले." पुढे आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, प्रशिक ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या कारंजाचा नवीन कार्यभार सांभाळण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापक यांच्या आवश्यक कागदपत्रांवर सह्यांची औपचारिकता सुरू आहे.ह्या सर्व गोष्टी आटोपल्यानंतर बँकेचे अधिकृत व्यवहार हे सुरळीत सुरू होतील.बँकेच्या व्यवस्थापिका आदरणीय अशा राऊत मॅडम यांच्या सोबत झालेल्या दुर्घटनेला त्या व्यक्तिगत जबाबदार आहेत. त्याच्याशी बँकेचा कुठलाही संबंध नाही.सर्वांच्या ठेवी ह्या अतिशय सुरक्षित आहेत.तसेच बँकेची स्थावर मालमत्ता सुद्धा सुरक्षित आहे.त्यामुळे कुठल्याही अफवेला बळी न पडता आपण आमच्यावर विश्वास कायम ठेवावा.बँक आपली सर्वांची आहे.संपूर्ण कारभार हा पारदर्शक आहे.आपल्याला कुठलीही चौकशी करण्याचे अधिकार आहेत.त्यासाठी आपण बँकेत येऊन अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाशी चर्चा करू शकता. आदरणीय पूर्व व्यवस्थापक मॅडम परत रुजू होईपर्यंत नवीन प्रभारी व्यवस्थापक रुजू झाले आहेत.अशी माहिती सुद्धा त्यांनी या वेळी दिली.
यानंतर उपस्थित सर्वांना काही प्रश्न व अडचणी विचारून सभेच्या इतिवृत्तला सर्वांनी संमती दिली.
शेवटी बँकेचे संचालक आशिष बंड यांनी आभार प्रदर्शन केले.