कारंजा लाड :
मदत तुमची छोटी, मोठी हास्य येईल कुणाच्या तरी ओठी, हे ब्रीदवाक्य घेऊन एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्टही संस्था अकोला वाशिम यवतमाळ पालघर परिसरात गेल्या चार वर्षांपासून समाजातील गरजू व वंचित घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.या वर्षी दिवाळीच्या सणानिमित्त ही संस्था ३११ किराणा किट, कपडे, फराळ आणि मिठाईचे साहित्य वाटप करणार आहे. त्यामुळे गोरगरीब, वंचितांच्या अंधारलेल्या घरातही दिवाळीचा प्रकाश निर्माण होणार आहे.
एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने १०० कुटुंबही दत्तक घेतले आहेत.त्यांना दर महिन्याला किराणा व आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे काम प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन केली जाते.
गरजु व निराधार कुटुंब ज्यांच्याकडे एकवेळ जेवणाची व्यवस्था नाही ज्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही व जे थकलेले आहेत अशा व्यक्तींना किराणा किट देण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून एक ऊब जाणिवेची सातत्याने करीत आहे. या संस्थेमधील सदस्य एकमेकांशी व्हाट्सअप ग्रुपने जुळलेले आहेत.स्वतःच्या,मुलांचे, मुलींचे, पत्नीचे,आई-वडिल व मित्रांचे वाढदिवस,आनंदाचे क्षण साजरे करताना स्वेच्छेने विशिष्ट रक्कम संस्थेच्या खात्यात टाकतात. कोणी आप्तस्वकीयांचे दुःख बाजूला ठेवून तेरवी व होणारा इतर खर्चही एक ऊब जाणिवेचीला देतात. व्यापारी, डॉक्टर, इंजिनीअर,पोलिस, शिक्षक, कारागीर, तलाठी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आपल्याला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतूनही छोटीशी रक्कम देणारे विद्यार्थी अशी विविध क्षेत्रांतील महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील देणगीदार संस्थेला देणगी पाठवीत असतात. ज्या कुटुंबांना यामध्ये मदत केली जाते ते प्रामुख्याने वाशिम, यवतमाळ, अकोला व पालघर जिल्ह्यातील आहेत.मिशन दिवाळी या उपक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील मानोरा,कारंजा व मंगरूळपीरसह पालघर, यवतमाळ जिल्ह्यातील कुटुंबांना या संस्थेकडून किराणा किट, कपडे आणि मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे. या मिशन दिवाळीमुळे अनेक कुटुंबांची दिवाळी ही तेजोमय व आनंदी होणार आहे हे मात्र निश्चित.
देशातील विविध राज्यांसह विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांकडूनही मदत मिळत असते.गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्टला महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, यवतमाळ, अहमदनगर, पालघर, पुणे, अमरावती, नाशिक सह अनेक जिल्ह्यांतून सातत्याने मदत मिळत असते. गुजरात,ओरिसा या राज्यांतून मदत येत राहते.शिवाय अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, साऊथ आफ्रिका यांसारख्या देशातूनही मदतीची साथ मिळत आहे. अनेक देणगीदार हे पैसे आणि धान्य या रूपात आपली मदत करीत आहे.वाशिम जिल्ह्यासोबतच यवतमाळ, अकोला व पालघर जिल्ह्यातही आपली मदत पोहोचवण्याचे काम एक ऊब जाणिवेची करीत आहे, याचा वंचिताना आधार होत असून त्यांची दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. वाचक ही आपली मदत Account Number: 120000693563,IFSC CODE: CNRB0005998 ,BANK NAME: CANARA BANK KARANJA (LAD) या एक ऊब जाणिवेची चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात पाठवू शकतात.
अधिक माहितीसाठी 9637062064, 8788404285 या मोबाईल क्रमांका वर संपर्क साधू शकतात.
आपल्या प्रतिक्रिया द्या....