भद्रावती पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर धाड टाकून दोन गोवंश कापलेल्या अवस्थेत जप्त करून धारदार शस्त्रासह दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
झाले असे की, गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक डोलारा तलाव परिसरात गोवंश कापणार असल्याची माहिती पो. नि. इंगळे. यांना मिळाली. या आधारे इंगळे यांनी त्याच्या चमूसह सापळा रचून शुक्रवारी सकाळी 6 वाजता अबू कुरेशी यांच्या घरी धाड टाकली. या धाडीमध्ये दोन इसम शकील रहेमान शेख (40) रा. भद्रावती व मोहम्मद बिराम शेख (32) रा. डोलारा हे दोघेही हातात धारदार शस्त्र घेऊन गोवंश कापत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना अधिक विचारपूस केली असता सदर कृत्य अबू कुरेशी रा. डोलारा याच्या सांगण्यावरून मास विक्रीकरिता केलेअसल्याचे सांगितले. अबू याच्या घराची झडती घेतली असता आणखी तीन जिवंत जनावरे तिथे आढळून आली. घटनास्थळी मिळालेल्या जनावरांबाबत चौकशी करण्यात आली. ही जनावरे अबू याच्या मांगली येथील जंगल परिसरात गुप्त ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस इथून आणले असल्याचे त्यांनी सांगितले. सदर फार्म हाऊसची झडती घेतली असता तिथे आणखी 13 गोवंश बंदिस्त अवस्थेत आढळून आली. सदर गोवंशांना पंचाच्या समक्ष ताब्यात घेण्यात आले. अबूचे फार्म हाऊस येथून 13 व त्याच्या अवैध कत्तलखाण्यातून जप्त केलेली तीन अशा 16 गोवंशाची किंमत एकूण 1, 12, 000 असून या सर्व गोवंशांना जैन मंदिर येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. मुख्य आरोपी अबू कुरेशी रा.डोलारा याच्यासह शकील रहेमान शेख (40) रा. भद्रावती व महोम्मद बिराम शेख (32) रा. डोलारा या तिघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारणा सन 1976 चे सुधारणा सन 2015 चे कलम 5, 5 अ 5 ब, 9, 11, कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात असलेले आरोपी शकील रहेमान शेख व महोम्मद बिराम शेख या दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी अबू हा फरार असून भद्रावती पोलिस त्याचा कसून तपास करीत आहेत.