कारंजा (लाड) : कारंजा नगर पालिकेचे मा.मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी नगरपरिषद कारंजा (लाड) अंतर्गत नूतन सभागृह, यशवंत कॉलनी येथे “ प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने” ( पी एम स्वनिधी ) अंतर्गत भव्य लोककल्याण मेळावा भावनिक आणि उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.या मेळाव्यात उप मुख्याधिकारी जितेंद्र पटले, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कारंजाचे व्यवस्थापक राहुल काळे, कॅनरा बँकेचे रोहन शेंडे ,भटकर, सर्वधर्म मित्र मंडळ कारंजाचे अध्यक्ष तसेच पथविक्रेता समिती सदस्य श्याम सवाई, हसन पटेल, नलिनी डहाळे, समाजकार्यकर्ते भारत हांडे ; सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पत्रकार संजय कडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात प्रातिनिधिक स्वरूपात काही पथविक्रेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम कर्ज ₹15,000/- व द्वितीय कर्ज ₹25,000/- इतक्या कर्जाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बदललेली पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृद्धी योजना, डिजिटल व्यवहाराचे महत्त्व, तसेच जीवन विमा योजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मेळाव्याचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी आपल्या मनोगतात हृदयस्पर्शी शब्दांत सांगितले — “पथविक्रेते हे आपल्या शहराच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी आता काळाच्या वेगाशी जुळवून घेत डिजिटल व्यवहारांचा स्वीकार करावा. या डिजिटल प्रवासामुळे त्यांची ओळख, विश्वासार्हता आणि आर्थिक उन्नती अधिक दृढ होईल. तसेच प्रत्येक पथविक्रेत्याने स्वतःचा विमा काढून आपल्या कुटुंबासाठी सुरक्षिततेची कवच निर्माण करावी कारण समृद्ध भविष्य हे सुरक्षित वर्तमानावरच उभं असतं,” असे त्यांनी आवाहन केले. या मेळाव्यास कारंजा शहरातील असंख्य पथविक्रेते उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. श्याम सवाई यांनी भूषविले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन शहर अभियान व्यवस्थापक संघरत्न नरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन समुदाय संघटक रूपाली साखरकर यांनी केले . सदर लोककल्याण मेळावा यशस्वी करण्यासाठी नगर परिषद कारंजा कर्मचारी संघरत्न नरवाडे, राजू मनवर, रूपाली साखरकर, चंदन निशांनराव यांनी अथक परिश्रम घेतले.