वाशिम : प्रत्येक पाच वर्षांनी होणाऱ्या स्वतंत्र भारतातील लोकशाहीच्या पवित्र मंदिरातील म्हणजेच संसदेतील लोकप्रतिनिधी म्हणजेच "खासदार" हे एक संवैधानिक पद आहे.व त्यांना निवडून संसदेत पाठविण्याकरीता मतदारांना दर पाच वर्षांनी "मतदान" करावे लागते हे सर्वसामान्य मतदारांना केवळ संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतच कळते. मात्र एकदा संसदेची निवडणूक झाली व खासदार निवडून गेले की,मग मात्र पुढील पाच वर्षापर्यंत हे "खासदार" मतदार राजाच्या डोळ्याने केव्हाही दिसत नाहीत. हे भिषण वास्तव आहे.त्यांचा लोकसभा मतदार संघ हा केव्हा केव्हा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांना जोडून आणि अनेक तालुके व अनेक विधानसभा मतदार संघाना जोडून,शेकडो गावखेडी मिळून तयार झालेला असतो.परंतु एखाद्या मोठ्या शहराचा अपवाद सोडला तर स्वतःच्याच मतदार संघातील अनेक शहरे किंवा शेकडो गावखेड्यातील लोकांना त्यांच्याच खासदाराची ओळख नसते.किंवा खासदार दृष्टीस पडत देखील नाही.तसेच महत्वाचे म्हणजे ज्या खासदाराला मतदार राजा निवडून संसदेत पाठवतो त्या खासदाराला लोकसभा मतदार संघाच्या विकासाकरीता काही विकास निधी मिळतो किंवा नाही ते देखील मतदार जनता जनार्दनाला कळतच नाही.कारण ज्याप्रमाणे आमदार निधीमधून विकासाची कामे होतात.आमदार महोदय प्रत्येक शहरात व खेडोपाडी,वार्डावार्डात, सार्वजनिक विकासकामाच्या भूमिपूजनाला आणि लोकार्पणाला दिसत असतात. त्याप्रमाणे खासदार विकास निधीतून होणारी लोकहिताची सार्वजनिक विकासकामे, भूमिपूजन व लोकार्पण दिसतच नाहीत.किंवा लोकसभा मतदार संघाच्या प्रत्येक शहरात आणि प्रत्येक खेड्यात खासदाराने केलेली कोणतीही ठोस अशी पूर्णत्वास नेलेली कामे दिसत नाही.व हे भिषण असे वास्तव जर पाहिले तर मग सर्वसामान्य मतदार राजाला प्रश्न पडतो की, "आपण खासदार निवडून देतो तो कशासाठी ?" आज गगनाला भिडलेली महागाई ! डिझेल पेट्रोलसह स्वयंपाकाच्या जीवनावश्यक गॅसचे वाढलेले भाव ! देशात होणारे शिक्षणाचे पाश्च्यात्तीकरण आणि खाजगीकरण,सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या आणि संपत चाललेल्या सरकारी नोकऱ्या, उद्योगधंद्याचा तुटवडा, रोजगाराची कमतरता, मोडकळीस येत असलेला पारंपारिक कृषी व्यवसाय, शेतकऱ्याच्या मालाला बेभाव आणि व्यापाऱ्याच्या मालाला दहा पटीने मिळणारा भाव, दिवसागणीक शेतकऱ्याचे कमी कमी होत चाललेले उत्पादन आणि त्यातून अत्यल्प होणारे उत्पन्न,आणि त्यामुळे होणारे सावकारी कर्ज आणि आत्महत्या ! या व इतरही मतदारांच्या समस्यांना वाचा फोडून सर्वसामान्य जनता जनार्दनाच्या न्याय्यहक्काकरीता संसदेत निर्णय घेऊन, गावखेड्यातील मतदारांना त्यांचा अधिकार मिळवून देतांना कोणताही खासदार दिसतच नाही. त्यामुळे मग प्रश्न पडतो की, "मतदारांनी खासदाराला निवडून द्यायचे तरी का ? आणि कशासाठी ? निवडून आलेल्या खासदाराला मतदारांसाठी भरीव कामगिरीच करता येत नसेल तर लोकसभा निवडणूकीचा अट्टाहास का ? आणि कशासाठी ? याचा जाब खासदारकीचे उमेद्वार मतदार राजाला देतील काय ? आणि निवडणूकीच्या जाहिरानामा किंवा वचननाम्याच्या अंमलबजावणी करीता वचनबद्ध राहून आपण जनतेप्रती प्रामाणिक,जागरूक, हजरजवाबी व विश्वासू खासदार म्हणून राहतील काय ? व लोकशाहीच्या पवित्र मंदिराची संसदेची पवित्रता राखतील काय ? हे निवडणूकीतील उमेद्वारांनी सर्वसामान्य मतदारांना पटवून देण्याचे आवाहन, वाशिम जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.