वाशिम जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्मा आणि अधून मधून ढगाळ वातावरणाने वातावरण पूर्णतः बदलले असून दि. 18 ऑक्टों.2024 रोजी दुपारी व रात्री जिल्ह्यातील ग्रामिण भागासह कारंजा मानोरा तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतातील गंजी मारून असलेल्या आणि बाजार समिती मधील सोयाबीनचे नुकसान झाले असल्याचे वृत्त असून, चालू आठवड्यात आणखी चार पाच दिवस,भाग बदलवीत विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.मात्र ऐन सोयाबीन पिक काढणीला आलेल्या दिवसात आणि ऐन दिपावलीच्या सणासुदीच्या तोंडावर उद्भवलेल्या या पावसाळी परिस्थितीमुळे शेतकर्याच्या तोंडचा घास हिरावून जाण्याची भिती व्यक्त होत आहे.त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा करंजमहात्म्य परिवाराचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी,हवामानाचा अचूक अंदाज वर्तवीत,जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे ग्राम रुई गोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी सांगीतले की, सध्या वातावरणात पावसाकरीता अनुकूल बदल झाले असून त्याचाच परिणाम म्हणून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्,मराठवाडा, विदर्भ इत्यादी ठिकाणी भाग बदलवून पाऊस पडत आहे.हा पाऊस चालू आठवड्यात दि.19 ऑक्टों.ते 22 ऑक्टो.आणि पुढे चार दिवसाच्या अंतराने परत दि.27 ऑक्टो.ते 30 ऑक्टो. पर्यत भाग बदलवून कोठे मुसळधार तर कोठे वादळी स्वरूपाचा आणि काही भागात रिमझिम स्वरूपाचा होणार असून आपल्या वाशिम जिल्ह्यात आणि आसपासही पडणार असल्याचे सांगतांना हा पाऊस वळवाचा किंवा अवकाळी पाऊस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या दरम्यान ढगांचा प्रचंड गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी विजा पडण्याची शक्यताही सांगीतलेली आहे. त्यामुळे शेतकरी राजा आणि ग्रामस्थांनी आपल्या शेतातील पिकाची विशेष काळजी घ्यावी. काढणीला आलेले सोयाबीन चार दिवस काढूच नये.काढलेले सोयाबीन व्यवस्थीत गंजी लावून ताडपत्रीने झाकून ठेवावे किंवा शेतात न ठेवता घरी घेऊन यावे. भाजीपाला व फळपिकाची काळजी घ्यावी.सायंकाळ पूर्वीच शेतातून परत यावे.विजा कडाडत असतांना आपल्या शेळ्या मेंढ्या व जनावरांना हिरव्या झाडाखाली बसवू नये. काही भागात मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने पुराच्या पाण्यातून जावू नये.विजा कडाडत असतांना रेडीओ, टिव्ही,मोबाईल फोन बंद ठेवावे. मोबाईल फोन वरून बोलू नये. किंवा पूराचे वा आकाशाचे चित्रीकरण करू नये.अशा सूचनाही हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दिल्या आहेत.