कारंजा : आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत,मराठी श्रावण महिन्याच्या अखेरच्या दिवशी, शेतकर्यांचा महत्वाचा सण "बैल -पोळा" साजरा करण्यात येतो. खरे म्हणजे पूर्वी कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसतांना पूर्वीची शेती पूर्णतः बैला द्वारे जमीन कसूनच केली जायची. शेतामधील नांगरणी, डवरनी वखरणी पासून कामे बैलाकडूनच केली जायची. शिवाय शेतात बी-बियाणे,खतं टाकण्यापासून तर शेतातील पिकलेले धान्य घरी आणायचे. बाजारपेठेत न्यायचे. ही सर्वच कामे बैलांकडूनच केली जायची आणि दळण वळण प्रवासाकरीता सुद्धा बैलगाडी-डमणी-छकडं असी तत्कालिन वाहन सुद्धा बैलांकडूनच वाहीली जायची.
आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीत या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता,प्रत्यक्ष देवाधिदेव महादेवाच्या लाडक्या असणाऱ्या नंदीचे प्रतिरूप मानून,एक दिवस बैलाची दैनंदिन कामातून पूर्णपणे रजा देऊन,त्याला केशरयुक्त उटणी लावून,आंघोळ घालून,त्यांचें अंगावर नविन कापड म्हणजेच झुल घालून, गळ्यामध्ये रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून,त्यांची थाटमाटात पूजा करण्याकरीता,माणसांचे खाद्य असणारे गोडाधोडाचे पदार्थ,पुरणपोळी खाऊ घालून, त्याची थाटात बॅन्डबाजाने वाजत गाजत गावातून मिरवत नेऊन मिरवणूक काढीत पोळ्यात नेऊन तोरणा खालूनन आणतात. तोरणा खालून आल्यावर श्री.महादेवाचे मंदिरात दर्शनार्थ नेऊन,नंतर गावातील घरोघरी पाहुण्या प्रमाणे नेले जाते. घरोघरी सुद्धा बैलांची पूजा करून पुरणपोळी भरविली जाते. खरेतर शेतकरी राजा आपल्या पशुधनावर बैलांना देत असलेली हीच वागणूक त्यांच्या मुलाबाळांनी भविष्यात,परंपरा म्हणून जपण्याकरीता त्यांचेवर तसे संस्कार व्हावे म्हणूनच लहान मुलांचा "तान्हा पोळा" ही प्रथा दृढ झाली असावी. त्यामुळे आधीची दिवसी खऱ्या खुऱ्या बैलाची पूजा जशी केली जाते. त्याचेच अनुकरण लहान मुले तान्ह्या पोळ्याच्या दिवशी त्यांच्या बैलावर करीत असतात. त्यामुळेच परंपरेप्रमाणे,श्री कामाक्षा देवी मंदिर परिसरातील लहानग्यांनी सुध्दा, शुक्रवार रोजी तान्हा पोळा असल्याने तान्ह्या पोळ्याचा मनमुराद आनंद घेतल्याचे दिसून आले .