वाशिम : संपूर्ण महाराष्ट्रात वृद्ध साहित्यीक अष्टपैलू कलाकार, लोककलावंत आणि सेवाव्रती सामाजिक कार्यकर्त्याच्या विविध मागण्या प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सामाजिक न्याय विभागाकडूनच,गेल्या सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकांपासून प्रलंबित ठेवण्यात आलेल्या असून गेल्या पाच वर्षापासून जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समितीची पुनर्रचना न झाल्याने, मानधन मिळावे म्हणून करण्यात आलेले गरजू लोककलावंताचे हजारो अर्ज समाज कल्याण वाशिम येथे धुळ खात पडलेले आहेत.गेल्या पाच वर्षात दरवर्षी शंभर या प्रमाणे पाचशे कलावतांना शासनाकडून मानधन सुरू व्हायला हवे होते.परंतु शासनाच्या नाकर्तेपणामुळे तसे झाले नाही. त्यामुळे तळागाळातील, सर्वसामान्य,बहुजन लोककलावंतावर एक प्रकारे शासनाकडूनच अन्याय होत असल्याची भावना कलावंताची असून,वयोवृद्ध,दुर्धर आजारग्रस्त असलेल्या कलावंताना,प्रचंड महागाईच्या तडाख्यात उपासमारीला तोंड देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून यापुढेतरी शासनाने जास्त विलंब न करता, लवकरात लवकर जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समितीचे गठन करून गेल्या पाच वर्षातील बैठका घेऊन, सरसकट सर्वच कलावंताचे विनंती अर्ज मंजूर करून त्यांना अविलंब मानधन सुरू करावे व इतरही मागण्यांकरीता, जिल्ह्यातील कलावंताच्या अग्रणी असलेल्या विदर्भ लोककलावंत संघटनेकडून,येत्या बुधवारी दि 24 डिसेंबर 2024 रोजी वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, निर्णायक लढाई म्हणून, कांतिकारी धरणे आंदोलन होणार असून ह्या आंदोलनात जिल्हयातील सर्वच लोककलावंत,भिमशाहिर, शाहिर,गोंधळी, वासुदेव,किर्तनकार,प्रवचनकार, वाद्य कलावंत,नृत्य कलावंत,गायक यांनी कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता, गटतट, संस्थाभेद न मानता एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, नंदकिशोर कव्हळकर, शेषराव मेश्राम, पूर्णाजी खंदारे, अश्विन जगताप, डॉ ज्ञानेश्वर गरड, प्रदिप वानखडे यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या, प्रलंबीत असलेल्या पुढील मागण्या १) शासनाने वाढत्या महागाईचा विचार करून वृद्ध साहित्यीक कलाकाराचे किमान मानधन दरमहा पाच हजार रुपये तरी करावे.२) पाच वर्षापासून स्थगीत असलेल्या जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीची पुनर्रचना करून गठन करावे.३) वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती मध्ये राजकिय कार्यकर्त्याचा समावेश न करता केवळ लोककलावंताना स्थान मिळावे.४) गेल्या पाच वर्षापासून मानधना करीता प्रलंबीत असलेल्या कलावंताचे नियमानुसार दरवर्षी शंभर प्रमाणे पाचशे कलावंताचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना मानधन सुरू करावे.५) प्रलंबीत मृतक लोककलावंताच्या वारसदारांना मानधन सुरु करावे. ६) गेल्या पाच वर्षापासून प्रलंबीत असलेला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा,सामाजिक कार्यकर्ता संमेलन तथा व्यसनमुक्ती साहित्य संमेलन घेऊन ,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार,पद्मश्री कर्मविर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,संत रविदास महाराज पुरस्कार तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात यावे. ७) महाराष्ट्र शासनाच्या सर्वच पुरस्कारार्थींना दरमहा किमान पाच हजार रुपये प्रमाणे मानधन सुरू करण्यात यावे. ८ ) महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारार्थींना भारतिय रेल्वे प्रवासामध्ये मोफत सवलत मिळावी.९ ) बहुजन समाजातील सप्तखंजेरी राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा सर्वोच्च असलेला,महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा. आदी रास्त मागण्या शासनाने पूर्ण कराव्या अशी लोककलावंताची अपेक्षा आहे.अन्यथा लोककलावंताना यापुढील आंदोलन आमदार, खासदार,मंत्री महोदय यांच्या राहत्या घरासमोर करण्याचा मार्ग निवडावा लागेल आणि आगामी सार्वत्रिक निवडणूकावर बहिष्कार टाकण्याचा अंतिम निर्णय घ्यावा लागेल असा स्पष्ट इशाराही कलावंतानी दिला आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....