गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केलेल्या जंगली हत्तींचा कळपाने देसाईगंज तालुक्यात काल २३ सप्टेंबर रोजी प्रवेश करीत शेतपिकांचे नुकसान केले. मात्र जंगली हत्तींचा ठिय्या अजूनही देसाईगंज तालुक्यात जिल्ह्याच्या सीमेवर असून संकट मात्र कायम आहे. या हत्तीच्या कळपावर वनविभाग नियंत्रण ठेवत असून गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील वनविभाग ॲक्शन मोडवर आहे.
जंगली हत्ती चा कळप बोडदा गावापासून ६-७ सात किलोमीटर दूर अंतरावर गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचला परंतु दिवसभरापासून एकाच ठिकाणी हत्ती घुटमळत आहेत त्या कारणाने देसाईगंज तालुक्यात व जिल्ह्यात हत्तीचे संकट टळले असे म्हणता येणार नाही. वडसा वन विभाग व गोंदिया जिल्ह्यातील वन विभाग यासाठी सतत हत्तीवर देखरे ठेवून आहेत. सकाळी काही वेळा पुरता जरी सुटकेचा श्वास परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला असला तरी अजून ती भीती टळली नाही. कालपर्यंत हत्तीच्या कळपात २० हत्ती दिसत होते पण आज पुन्हा २३ हत्ती एकत्र आलेले असल्याचे कळते. सध्या तरी हत्तीने आपला मोर्चा गोंदिया जिल्ह्यातील खोडदा या गावाकडे वळविला असून गोंदिया जिल्ह्यातील वनविभाग सुद्धा सतर्क झालेला आहे व त्यावर लक्ष ठेवून आहे. एकंदरीत या हत्तीच्या कळपाने गावात प्रवेश केला नाही व मनुष्य हानी झाली नसली तरी नागरिकांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभाग सातत्याने हत्तीच्या कळपावर देखरेख ठेवत असून हत्ती बघण्यास कोणीही जावू नये असे वारंवार नागरिकांना सूचना देत आहेत.