चंद्रपूर : एका व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करणार्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सौरभ प्रकाश हिवरे (22, रा. चारगांव बु., ता. वरोडा, जि. चंद्रपूर) व अतुल मधुकर मडकाम ( 29, रा. जाम, ता. समुद्रपूर, जि. वर्धा ) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
शेगाव पोलिस ठाणे हद्दती शेगाव हद्दीतील चारगांव (बु.) वन विभाग चेक नाका जवळील झुडपात 10 नोव्हेंबरला एका झुडपात एका अनोळखी व्यक्तींचा अनोळखी आरोपींनी दगडाने ठेचून निर्घुण खून केल्याची घटना घडली. या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले. त्याचे नाव तुळशिराम महाकुलकर (60, रा. भेंडाळा) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींचा शोधात दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी सौरभ हिवरे व अतुल मडकाम यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुल दिली.
घटनेचा पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर व जितेंद्र बोबडे, हवालदार धनराज करकाडे, संजय आतकूलवार, प्रकाश बल्की, नितीन साळवे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, चंदू नागरे, संदीप मुळे आदींनी केली.