घरभाड्याच्या जुन्या थकित रक्कमेवरुन झालेल्या वादातून भाडेकरूने चक्क घरमालकीनीची हत्या केली.ही घटना चंद्रपूर शहरातील नगिना बाग परिसरात मंगळवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. शर्मीला शंकर सकदेव (68) असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी अवघ्या चार तासात आरोपी भाडेकरूस गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथून अटक केली आहे.
आरोपी हा मागील काही वर्षांपासून चंद्रपुरात नोकरीनिमित्त नगिनाबाग परिसरातील सवारी बंगल्याजवळी शर्मीला सकदेव यांच्या घरी किरायाने राहत होता. मागील काही महिन्यांचे घरभाडे थकित होते. त्यामुळे शर्मीला सकदेव यांनी भाडे वसुलीसाठी आरोपीकडे तगादा लावला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होता. 16 मे रोजी याच कारणावरून दोघांत वाद झाला. यावेळी राग अनावर झाल्याने आरोपीने शर्मीला सकदेव यांचे डोके फरशीवर आदळून व गळा दाबून तिचा खून (Killing Landlady)केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, आरोपीस गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, रामनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश मुळे, सहायक पोलिस निरीक्षक बोबडे, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले आदींनी केली.