कारंजा : येथील एसआयपी अबॅकस अकादमीतर्फे रविवार, ९ मार्च रोजी देशमुख मंगलम येथे अकादमीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांनी अवघ्या पाच मिनिटात १२५ गणिते सोडविण्याचा करिष्मा करून दाखवला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे अंकगणितीय सोडविण्याची जलद प्रक्रिया पाहून पाहुणे मंडळी आश्चर्यचकित झाली होती.
स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एसआयपीचे खान्देश, मराठवाडा वरिष्ठ क्षेत्र प्रमुख राजेंद्र नन्नवरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार कुणाल झाल्टे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, गोविंद इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष किरण चौधरी, ग्रामीण पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे, कंकुबाई विद्यालयाचे संजीव रुईवाले, जे. डी. चवरे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्रीनिवास जोशी, , ब्लु चीप कॉन्व्हेंटचे आनंद इन्नानी, आर.जे.चवरे शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चोपडे, जे. सी. हायस्कूल चे मुख्याध्यापक भारत हरसुले
आदी उपस्थित होते. यावेळी एसआयपी अबॅकसच्या पहिली ते पाचव्या लेव्हलच्या विद्यार्थ्यांची अंकगणितीय स्पर्धा घेण्यात आली. अवघ्या पाच मिनिटात ही स्पर्धा पार पडली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी ताबडतोब आकडेमोड करून अचूक उत्तरे लिहिली आणि पेपर सबमिट केला. दरम्यान, विद्यार्थ्यांची उत्तरे सोडविण्याची कला पाहून मान्यवर चक्रावले होते. स्पर्धा आटोपल्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या पाल्याच्या भविष्याचा पाया मजबूत करायचा असेल तर प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांना अबॅकस अभ्यासक्रम शिकवावा असा सूर मान्यवरांच्या भाषणातून निघाला. सूत्रसंचालन जया भारती तर आभार संचालक काव्या गावंडे यांनी मानले. दरम्यान, स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे पेपर तपासून विजयी विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांना ट्रॉफी, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालक, विद्यार्थी तथा अन्य बहुसंख्येने उपस्थित होते. (श. प्र.)