कारंजा (लाड) : महायुती शासनाच्या विरोधात,महाराष्ट्रात सर्व्हे जात असल्यामुळे, महाराष्ट्रातील निवडणूका सणासुदीच्या दिवसाचे आणि पावसाळ्याचे निमित्त करून पुढे म्हणजे नोहेंबर 24 मध्ये घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगत आहे.परंतु तसे असले तरीही सर्वच पक्षांनी आपआपल्या नेत्यांना मतदार संघात सक्रिय होऊन निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश दिले असल्याचे कळते.मात्र सर्वच पक्षात सारे काही आलबेल असे मात्र अजिबात नाही.आज रोजी प्रत्येक पक्षात गटबाजी उफाळून आलेली असून,गटातटात विभागलेले हे नेते आपआपले वर्चस्व सिद्ध करण्याकरीता आपापल्या समर्थकासह मतदार संघातील गावोगावी-वार्डा वार्डात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र एकेका पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम सुरु आहेत.बस्सं प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेद्वार नेते हे केवळ एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मश्गुल आहेत. त्यामुळे केव्हा झाली नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता असून, कार्यकर्त्यावर देखील कोणता झेंडा घेवू हाती ? असे म्हणण्याची वेळ येणार असून,नेत्यांच्या ह्या प्रतापामुळे सर्वसामान्य मतदार संभ्रमात पडले आहेत.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मतदार संघातील एकाच घरातूनही एकापेक्षा जास्त व्यक्ती इच्छुक उमेद्वार असून वेगवेगळ्या पक्षांशी आणि पक्षनेत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येते.तसेच भाजपा पक्षाचे वेगवेगळ्या गटाचे तिन नेते ही उमेदवारी करीता मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करीत असून. हिच परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची आहे. शिवसेना (उबाठा) असो की, शिवसेना (शिंदे)अशा परिस्थितीमुळे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात, महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज आणि अधिकृत उमेद्वाराला निवडणूकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शिवाय निवडणूकामध्ये जातियवाद उफाळून येण्याची शक्यता देखील असू शकते. त्यामुळे वेळप्रसंगी एकीकडे दहा उमेद्वारा मध्ये विभागणाऱ्या मतदारांची मते तर दुसरीकडे एकगठ्ठा मतदान होऊ शकते. शिवाय स्थानिक उमेद्वाराचा मुद्दा देखील ऐरणीवर येत असतांना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातील बंडखोरीला आळा घालण्याकरीता राजकिय पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी आपआपल्या पक्षतिल गटबाजी दूर करून, नेत्यांची व इच्छुक उमेद्वारांची समजूत काढून स्वतःच्या राजकिय पक्षांना एकसंघ - एकजूट करून "एक पक्ष - एकच उमेद्वार" हे धोरण अवलंबून, महायुती किंवा महाविकास आघाडी कडून "एकमेव - उमेद्वार" निवडून जाहीर केले पाहीजे.अन्यथा राजकीय पक्षासोबतच कारंजा-मानोरा विधान सभा मतदार संघाचे आणि मतदार संघातील निष्पाप अशा हजारो मतदार संघाचे प्रचंड नुकसान होणे अटळ आहे. आणि तसे जर झाले तर कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचा विकास कोसो दूर जाणार असून, जनतेला विकासा पासून वंचित रहाण्याची वेळ येणार असल्याचे मत दिव्यांग जनसेवक-ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.