अकोला; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल कोरडे यांचा 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार व बी. वैष्णवी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता ब्रँड अँबेसिडर डॉ.विशाल कोरडे यांनी मतदान जनजागृती उपक्रमात अमूल्य योगदान दिले, याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे दिसून आल्याबद्दल जिल्हा प्रशासनातर्फे डॉ.कोरडे यांचा सत्कार करण्यात आला.डॉ.विशाल कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या माध्यमाने संपूर्ण अकोला जिल्ह्यात दिव्यांग, नव मतदार, महिला व जेष्ठ मतदार यांना मतदान करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमातून प्रेरित केले.प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवून त्यांना मतदानासाठी सहकार्य केले.अंध व दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीच्या साह्याने मतदान कसे करायचे ?याविषयी विविध गावात कार्यशाळा घेऊन मतदार साक्षरता अभियान राबविले*. डॉ. विशाल कोरडे राबवत असणाऱ्या मतदार साक्षरता अभियानाची दखल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने सुद्धा घेतली. सदर मतदार साक्षरता अभियानात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अनामिका देशपांडे,अस्मिता मिश्रा, विजय कोरडे,गणेश सोळंके, सिद्धार्थ ओवे, रोहित सूर्यवंशी, श्रीकांत कोरडे व प्रतिभा काटे यांनी आपला सहभाग नोंदविला. जिल्हा प्रशासनाने सत्कार केल्याबद्दल खासदार अनुप धोत्रे, भारती शेंडे, प्राचार्य रामेश्वर भिसे, अरविंद तिडके, सरोज तिडके व डॉ.अर्चना मोरे यांनी डॉ . विशाल कोरडे यांचे अभिनंदन केले.