कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): कारंजा पंचक्रोशितील सर्वच मंडलामध्ये दि. १८ जुलै रात्री पासून, दुसरे दिवशी १९ जुलै सकाळ पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळल्यामुळे परिसरातील अडाण पात्रा जवळच्या आणि उमा केदार नदीलगतच्या शेतजमीनी खरडून गेल्याने शेतकरी राजाचे अतोनात नुकसान झाल्याची वस्तूस्थिती असून,महसूल विभागाकडून पंचनामे सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अति पावसाने उमा आणि केदार नदीच्या महापुराने पोहा येथील मुळ गाव आणि तांड्याचा संपर्क सहा तास पर्यंत तुटला होता. तर कारंजा ते पिंजर अकोला मार्ग बंद झालेला होता. त्यामुळे गावाबाहेर पिंजर मार्गावर असलेल्या श्री दुर्गादेवी संस्थान मधील देवीच्या मुर्तीपर्यंत प्रथमच पाणी चढले होते. नदीपात्रा पासून हे मंदिर पंधरा फुट उंच असल्याचे सांगण्यात येते. यावरूनच या महापुराचा अंदाज येऊ शकतो. या पुरामुळे मुर्तिजापूर तालुक्यातील उमा धरण ओव्हरफ्लो झाले असून मार्गातील गावोगावी महागाव, लोहगाव, काजळेश्वर,पलाना इत्यादी ग्रामिण भागात शेतकर्याच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेत जमीनीने तात्काळ पंचनामे करून तात्काळ सरसकट आर्थिक मदतीची मागणी पोहा येथील ग्रामस्थांसह सरपंचा सौ शितल मंगेश मसने यांनी लावून धरली आहे.इतरही मंडलात शेतकर्याच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी येत आहेत.