देशाला तरुणाईच्या रुपात मोठी संपत्ती लाभली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. शालेय वयातच अनेकजण व्यसनाला बळी पडत आहे. पालकांनी शालेय वयातील मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. व्यसनामुळे अख्ख्ये कुटूंब उध्वस्त होत आहे. मुले आई वडिलांचे अनुकरण करतात. वडिलांनी आपले मुलांदेखत व्यसन करु नये किंवा मुलांना वडिलांनी तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारु आणायला सांगू नये. दारु व तंबाखू तसेच गुटख्यामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू दरवर्षी जगात ५.४ दशलक्ष लोक आपला जीव गमावतात. आकडेवारी नुसार सुमारे ९ लाख मृत्यू भारतात नोंदले गेले आहे. त्यांचे व्यसन वेळीच थांबवणे काळाची गरज आहे. व्यसनी तरुणांचे जीवन अंधारात ढकलल्या जात आहे. त्यांचे एक उज्वल भवितव्याचे स्वप्न देखील विरुन जात आहे. मुलांच्या मित्रांमुळेच व्यसन लागते. म्हणून पालकांनी लहान वयातच व्यसनावर अटकाव घातला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनाद्वारे व्यसनावर प्रहार करतात. त्यांची धडपड या देशाचा तरुण सुधरविणे आहे.
झाला गर्क कसा व्यसनात?
ऊठ रे ऊठ तरुणा । दे हात ।।धृ।।
आजचा तरुण हा व्यसनात तल्लीन झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तरुणांना ऊठ म्हणतात आणि त्यांचा हात मागतात. महाराज म्हणतात की, तु या देशाचा नवतरुण आहेस. व्यसनाचे मागे लागू नकोस. ही वेळ आता कुठेही थांबायची नाही. महाराज म्हणतात, आगे चल नौजवान आगे चल । समय नही रुकनेका ।। व्यसन अशी गोष्ट आहे की, कुलूप लावून कुलपाची चाबी फेकून देणे होय. व्यसनी मित्रांमुळेच आपण मोहजालात सापडतो. त्यासाठी चांगल्या मित्राची निवड करावी. राष्ट्रसंत तरुणांचा हात मागतात, जागृत व्हा तरुणांनो । अमुच्या वीर वृत्तीचा दिवा उजळवा ।। बलशाली तरुण हे देशाचे शक्ती स्थान आहे. देशाचे संरक्षण आणि संवर्धन तरुणच करु शकतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेतून तरुणांना प्रखर क्रांतिकारक संदेश देतात. तरुणांनो ! तुमचा हात द्या म्हणजे आपल्या गावाला प्रथम समृद्ध करण्यासाठी झटावे. असा आशावाद मांडतात. मनुष्य निरोगी, सात्त्विक बनावा । त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा । त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा । कोणासही ।। खर्रा खाऊन, बिडी, दारु पिऊन देशाचा तरुण वाया गेला. तो तरुण व्यसन न करता निरोगी व सात्त्विक असावा. व्यसनामुळे त्याचा व्यवहार त्रासदायी होऊ नये. आई-वडिल मुलांवर विश्वास करतात. मुलगा आयुष्याचा विनाश करतो. धन उडवतो, त्याचे मन स्थिर नसल्यामुळे व्यसनापायी शरीर अशक्त तसेच सडून गेले आहे.
प्राणाविण जणु देह दिसावा ।
महाली जणु कधि दीप नसावा ।
तसेच झाले तुजविण जग हे ।
हर्ष नसे कोणात ।।१।।
व्यसनी तरुणांच्या खर्रा, दारु शरीरात शिरली तर लिव्हरला नुकसान पोहचू शकते कारण शेवटी त्याला यकृताचा कर्करोग किंवा लिव्हर निकामी होऊन बळी ठरतो. व्यसनामुळे मेंदूवर परिणाम होतो. म्हणजेच या अशक्त देहात जणु प्राणच शिल्लक राहिला नाही असे वाटते. दिपक हे नाव उज्वल भवितव्याचे प्रतिक आहे. आपले जीवन प्रकाशमय करा व अंधकारातून प्रकाशाकडे गेले पाहिजे. जसे राजमहालात दिवे लागण झाली नाही असे वाटते. हा देहाच एक महाल आहे. या देहात आत्मारामाचा प्रकाश पडत नाही. कारण व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे जग सुद्धा तुझ्यासारखे झाले आहे. वासना प्रेरणेने निर्माण होत असते. व्यसनी तरुणांत कोणत्याच प्रकारचा आनंद नसतो. मनुष्याला मिळालेला देह हा अनेक जन्माचे पुण्य आहे. व्यसनामुळे या देहाला कोणतेच कार्य करायचा उल्हास उत्पन्न होत नाही.
सोडुनी दे ही आळस - निद्रा ।
हर्षभरे करी तव गुण - मुद्रा ।
तुकड्यादास म्हणे ऐकीना ।
सेवा ध्वनि कर्णात ।।२।।
व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे आळशी व्यक्तीला काम करण्याची इच्छा होत नाही. आळशीपणाला निंदणीय मानले गेले आहे. आळसामुळे निद्रा म्हणजे झोप वाढली. निद्रा म्हणजे झोप. निद्रा हा शब्द सुषुप्ती अवस्थेतील चित्ताच्या वृत्तीचा निदर्शक आहे. आळसामुळे ही चेतना मलीन होत जाते. आळसे वासना वाढली । आळसे वासना विस्तारली ।। असे दासबोध सांगते. सामान्य जीव, व्यक्ती झोपेतून ११ वाजता उठतो. ग्रामगीता सांगते की, जो १२ वाजेपर्यंत झोपला राहतो तो बिमार समजावा. तो खाटेवर झोपतो, खाटेवर खातो, पितो तो भाग्यवान नाही तर आळशी आहे. सकाळी तर कोंबडा उठतो. तो सकाळीच बाग देतो मग तो कोंबडा भाग्यवान आहे का? मुळीच नाही. व्यसन सोडून दे आणि हर्षभरे म्हणजेच तुझा चेहरा आनंदाने फुलू दे. गुण म्हणजे लक्षण. तुझ्या चेहऱ्यावर नैतिकता, सत्वगुण दिसू दे. ध्यान मुद्रा केल्यामुळे चिंता कमी होते. मुद्रा केल्यामुळे सूक्ष्म शरीरात उर्जेचा प्रवाह सुरु होतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आवाज ऐक गड्या म्हणतात. माझे म्हणणे तू ऐकत नाहीस.
हे मानव सुनले बात ।
व्यसन को छोड दे सारे ।।
हे तरुणा तु सर्व व्यसनाचा त्याग कर. सेवा केल्याने मनुष्य सुंदर दिसतो. प्रत्येक तरुणाने आता सावध राहून देश हितासाठी प्रयत्न केले पाहिजे. तरुण असून आपलं रक्त देशाच्या हितासाठी उसळत नसेल तर स्वतःला नौजवान म्हणवून घ्यायचा काय फायदा? तू सेवा कर. जसे- छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या तरुणांना एकत्रित करुन स्वराज्य निर्माण केले. त्याचप्रमाणे तरुणांनी एकत्रित येऊन देशाची शक्ती वाढवावी. खरी देशसेवा हीच आहे तसेच आपल्या आई-वडिलांची सेवा करावी. येणाऱ्या पिढीकरीता एक आदर्श निर्माण करु या.
बोधः- तरुणांनी व्यसन सोडून बलवान व्हावे. नितिमान, बुद्धीवान व्हावे व जीवन देशसेवेकरिता लावावे. तरुणांनी देश हाच देव अशी भावना जागृत ठेवावी. प्रत्येक युवक आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. आपले जीवन कुठेही व्यर्थ न घालविता, कुठेही न फिरता आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करुन त्या ध्येयासाठी प्राणपणाने प्रयत्न करावे. देशसेवा हा सर्वात मोठा धर्म आहे.
आज तरुण खर्रा खाऊन लोकांच्या भिंतीवर पिचकारी उडवतो. त्याला कुणी म्हटले तर तो मुळीच ऐकत नाही. तो खर्रा खाऊन घरी कुठेही थुंकत नाही. गावाच्या रस्ता त्याचा नाही का? तेथेही तो थुंकतो. आपलं गाव स्वच्छ असावं. मग तालुका स्वच्छ असावा. जिल्हा स्वच्छ असावा. राज्य स्वच्छ असाव. देश सुद्धा स्वच्छ असावा. तर काही सुधारणा होऊ शकेल अन्यथा नाही.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....