जगन्नाथ बाबा परिसरातील दारुदुकानाविरोधात नागरिक एकवटले
चंद्रपूर : दाताळा रोडवर जगन्नाथ बाबा मठाजवळील देशी दारु दुकानाविरोधात परिसरातील नागरिक एकवटले आहे. सोमवारपासून नागरिकांनी दुकानाचे स्थालांतरण करण्याच्या मागणीसाठी जनविकास सेनेच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन सुरु केले होते. गुरुवारी परिसरातील महिलांसुद्धा एकत्र येत दारु दुकानाविरोधात भजन आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
दाताळा रोड मार्गावरील जगन्नाथ बाबा मठ परिसरात नव्याने दारु दुकानाला परवानगी देण्यात आली. मात्र याबाबत परिसरातील नागरिकांना पुसटशी कल्पना नव्हती. ज्या परिसरात दुकान सुरु होत आहे. त्या परिसरात अनेकांचे श्रद्धास्थान असलेले जगन्नाथ बाबा मठ आहे. तसेच परिसरात चांदा पब्लिक स्कूल, इंदिरा गांधी गार्डन स्कूल यासह विविध शाळा महाविद्यालये आहेत. तरीसुद्धा परवानगी दिल्याने उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात हे दुकान बंद पाडण्यात आले. त्यानंतर दुकानाचे या परिसरातून स्थालांतर करण्यासाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केले.
आता या आंदोलनात महिला सहभागी झाल्या असून गुरुवारी सायंकाळी भजन आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या भजन आंदोलनात आशाताई माकोडे, वंदू शिरपुरे, सीमा रुपदे, मनीषा बोबडे,रमा देशमुख, मेघा दखणे, , विद्या पिपरे, झाडे ताई,मेघा मघरे,वर्षा आंबटकर, अरुणा महातळे, माया बोढे,कविता, अवथनकर,मालिनी वानखेडे, लता मार्चेटवार,प्रतिभा रीटे, मंजिरी गायकी,,अंजली पिंगळे आदी महिला सहभागी झाल्या होत्या.