राम राम म्हणत मानवी जीवनमुल्यांचा ऱ्हास करीत रामराज्याच्या सिंहगर्जना करणाऱ्यांच्या या राज्यात चोरांना चोर म्हणून चालत नाही.ते श्रमिक,शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या पैशांवर डल्ले मारणारे हरामी दरोडेखोर जरी असले तरी
त्यांना सन्मानित ठरवून त्यांच्या आरत्या ओवाळाव्यात आणि त्यांना चोर म्हणणाऱ्या सज्जन, सदाचारी, प्रामाणिक समाजसेवकांना गुन्हेगार ठरवून राजकारणातून तडीपार करावे असा अंधेर नगरीतल्या चौपटराज्याचा दंडक असावा.गावात काही चोर लोकांच्या घरातील संपत्तीवर हात साफ करून अंधारात नव्हे तर दिवसाढवळ्या पसार होतात.अर्थात ते संगनमताशिवाय काही करू शकत नसतात.परंतू रामराज्य म्हणून कायदा आणि सुशासन दाखवायचे असेल तर आरोपी म्हणून कुणाला तरी बळीचा बकरा बनवावे लागते.मग बकराही असा शोधला पाहिजे जो अडचणींचा आणि मारका आहे.मग ते चोर निघून गेले त्या वाटेने एखादा निरपराध जरी रस्ता चूकून गेला तर त्यालाच चोर म्हणून पकडल्या जाते. काट्याने काटा काढण्याची नीति वापरुन कटकारस्थानाने कुंभाड रचले जाते.तुकडे फेकून किंवा काही लाभ देण्याच्या आमिषाने त्याच्यावरील आरोप सिध्द करणारे गाव पंचायतीतील लाचार भाड्याचे तट्टू तिथे बसविले जातात. मग ते क्रूर त्या निरपराध्याला अपराधी ठरवून त्याचा बळी घेण्यासाठी आपले सुरे पाजवून तयार असतात.यालाच पूर्वीपासून म्हणतात "चोर सोडून संन्याशाला फाशी" अशा अघोरी अमानविय वृत्ती त्या रामराज्यातही होत्याच आणि त्याच्याच सुधारित आवृत्ती,तसेच नमुने सध्याही कार्यरत आहेत.
देशातील सर्वात मोठी समृध्द लोकशाही असलेला आपला भारत हा देश आहे.आम्ही त्या देशाचे नागरीक आहोत याचा आम्हाला अभिमान होता आणि आजही थोडा शिल्लक आहे.परंतू येथे निपजलेली माणसे त्या लोकशाहीला कलंक लावणारी कटकारस्थानी निपजतील असे त्या लोकशाहीचे गोडवे गातांना कधी वाटले नसावे.कारण हल्ली परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे की,"बळी तो कान पिळी" या न्यायाने गुन्हेगार म्हणजे खरा गुन्हा करणारा,भ्रष्टाचारी म्हणजेच खरा अपहार करणारा, अशा कोणत्याही ठराविक निकषांची आज गरज राहिलेली नाही.त्याचप्रमाणे सहिष्णुता गहाण टाकून जातिय,धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखाच संपवायची दुर्बुध्दी कोणाला सहज होत नसते.त्यामागे सुध्दा कुटील राजकारण असते. तर अवमानजनक शब्द ठराविक चौकटीत बसत नसतील तरीही ठरवाल त्याला मानहानी प्रकरणातील ,किंवा भडकावू शब्द वापरले नाही तरीही सामाजिक अशांतता निर्माण करणारा गुन्हेगार ठरवण्यासाठी राजकारणी सिध्द असतात.त्याच्याविरूध्द भाड्याने जमा केलेले डझनाने पुरावे आणि न्यायनिवाडे करणारे काही बिना उपाधीचे न्यायशास्त्री एका पायावर तयार असतात. स्वतःच्या तुंबड्या भरायला अशा दुकानदाऱ्या करणाऱ्या लाचार प्रवृत्ती या देशातील खोट्या राजकारण्यांच्या दिमतीला भुईछत्र्यांप्रमाणे तयार असतात.मग तेथे अनेक तिलीट,चिलीट, तोमय्या,फोमय्या सगळे अनाचारी आणि त्यांचे सरदार जमा होतात.मग कोणावर ईडी सुरू होणार,कोण वर चढला की त्याची सीडी सीबीआय कधी काढून घेणार यांचे अद्यायावत अहवाल या भाड्याच्या तट्टूंकडे तयार असतात.मग ते सवयीप्रमाणे दिवसाही ओरडत राहतात आणि,रात्री झोपेतही तसेच बोंबलत राहतात.ही माहिती यांच्याकडे अगोदर पोहचण्याची नवी पध्दत म्हणजे संविधानिक पध्दतीने चालणाऱ्या शासनपध्दतीत घुसलेला हा सामाजिक शांती संपवणारा नवा भयंकर विघातक असा व्हायरस आहे.याशिवाय प्रसिध्द चाणाक्यनीतिलाही पराभूत करणारी कायदा आणि संविधानाची मोडतोड करून वापरलेली पारंगत राजकारण्यांची कुटनीति देशाच्या आणि विशेषत: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुडगूस घालत आहे.येथील महापुरुषांचे संधी मिळेल तेव्हा अवमान करणारा आणि विश्वासघातक्यांना मदत करण्याचा विडा उचललेला एक काळटोप्या तर येथून निघून गेला.परंतू त्याने या सुसंस्कारीत भूमीत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात निर्माण करून ठेवलेल्या घाणीचा दुर्गंध अनेक वर्ष येथील महाराष्ट्रीयन विसरू शकणार नाहीत.
. प्रदिर्घ वर्षांचा इतिहास असलेला कॉंग्रेस पक्ष आणि ईतर प्रादेशिक विरोधी पक्षियांना साम दाम दंडभेद वापरून कसे संपविता येईल,आणि एकाच भाजपचे सार्वभौम मनमानी राज्य कसे प्रस्थापित करता येईल या अघोरी महत्वाकांक्षेने ग्रासलेल्या भाजपमध्ये सध्या अशा प्रकारचा विध्वंसक व्हायरस घुसलेला आहे.परंतू हा विघातक विचारांचा भस्मासूर योग्य वेळी आपणासह कोणालाही भस्म करू शकतो या वास्तव सत्त्याचा मोदी आणि भाजपसारख्या बुध्दीमान पक्षाला विसर पडावा हे देशातील एक मोठे आश्चर्य आहे."आज के दीन निकल रहे...कल क्या होता देखा जायगा" या उन्मादात मानवी जीवनमूल्ये, संविधान, लोकशाही, जनतेप्रतीची राजनैतिक कर्तव्ये सर्व वेशीवर टांगून ठेवत दिशा सापडेल त्या मार्गाने भाजपची देशातील वाटचाल सुरू आहे. विरोधक संपवण्यासाठी मध्ये येईल त्याला चारी मुंड्या चित करत विरोधक मुळासकट संपविण्याचे,औषधालाही शिल्लक न ठेवण्याचे मनसुबे म्हणजे हा एक विखारी राजकीय संग्राम आहे.त्यामुळेच ओबीसी नसलेल्या निरव मोदी आणि ईतरांना ओबीसी ठरवून त्यांचा अवमान म्हणून शिक्षा आणि राहूल गांधींना तडकाफडकी संसदेतून तडीपार करण्यात आले.त्यांचे जे घर तडकाफडकी खाली करून घेण्यात आले त्या घरातील शिक्षणासाठी ठेवण्यात आलेले अनेक अनाथ,वंचित ते सुध्दा देशाच्या या माजी पंतप्रधानांचा मुलगा आणि नातू असलेल्या राहूलजींसोबत बेघर झालेले आहेत.दिल्लीतील निर्भयाचा भाऊ सुध्दा याच घरात राहून राहूलजींच्या मदतीने पायलट झालेला आहे.
लोकशाहीचे संरक्षक कवच म्हणून सत्ताधारी पक्षासोबतच भारतीय शासन व्यवस्थेत विरोधी पक्षियांनाही सन्मानाचे स्थान देणे हे संविधानिक संकेत आहेत.परंतू सर्व स्वायत्त संस्था आणि न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप करून विरोधकांचे काटे काढण्याचे विध्वंसक कारनामे हे देशातील लोकशाहीचे फार मोठे दुर्दैव आहे.राहूल गांधीसारखे विरोधी पक्षिय खासदार किंवा राज्याराज्यातील आमदार हे जनतेचे लोकशाहीतील प्रतिनिधी आहेत.ते जनतेच्या जीवनमानाचे प्रश्न, समस्या,वाढती महागाई,धोक्यात येत असलेला सामाजिक सद्भाव,देशाला विनाशाकडे नेणारी चुकीची आर्थिक वाटचाल या संवेदनशील विषयांवर विरोधी भुमिका घेतात.म्हणून ते समाजप्रेमी,राष्ट्रप्रेमी वाटण्याऐवजी मोदी आणि भाजपला देशद्रोही वाटतात.म्हणजे त्यांना वाटेतील गतिरोधक म्हणून बदनाम करून जनतेच्या नजरेतून उतरवले जाते.,दडपगीरी करून त्यांचे आवाज दाबले जातात.तरीही अनावर ठरत असतील तर राहूल गांधींप्रमाणेच राजकारणातून हद्दपार करायचे हे नीतिमुल्ल्याचे उद्घोष करणाऱ्या भाजपचे सुडाचे घातकी राजकारण आहे.सर्वसामान्न्यांचे जीवन समस्याग्रस्त करणारे मल्ल्या,निरव मोदी आणि अनेक चोरटे वैभवाचे जीवन जगत आहेत.त्यांना हात लावण्याची हिंमत नाही.मात्र जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या समाजसेवकांना त्यांचे आवाज दाबण्यासाठी दंडीत करून संपवणे. केजरीवालसारख्या अनेकांचा सुड उगवत राहणे. हे राजकारण म्हणजे खरोखरच हरामी चोरट्यांचा सन्मान आणि देशातील राष्ट्रभक्तांचा अवमान करण्यासारखी चिंतनिय परिस्थिती आहे.ही येथील लोकशाहीची सर्वात मोठी शोकांतिका आहे....!

संजय एम.देशमुख संपादकीय विश्वप्रभात
मोबा क्र.९८८१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....