अकोला - साहित्य हे चैतन्य असते. यामध्ये लेखणीतून मानवी भावभावनांचा संघर्ष उमटतो. जीवनातील वास्तवाचे दर्शन ही घडते. त्यामुळे साहित्य हे जीवनाला नवी दिशा देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कथाकार सुरेश पाचकवडे यांनी केले.
संवाद साहित्य मैफिलतर्फे गांधी रोडस्थित सभागृहात रविवारी आयोजित शब्द सोहळ्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी कवयित्री, लेखिका
प्रेमलता कावळे यांच्या "काहूर" कादंबरी तर प्रा. माधव देशमुख यांच्या "तत्वार्थ रामायण"पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सुहास उगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदघाटक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य पुष्पराज गावंडे, प्रमुख अतिथी कादंबरीकार लता बहाकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छाया उपशाम, ज्येष्ठ पत्रकार संजय देशमुख, प्रदीप खाडे, थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. ए. एस. सोनोने, संत गाडगेबाबा सेवा प्रतिष्ठानचे संयोजक निशिकांत बडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन प्रा. महादेव लुले यांनी केले. तुळशीदास खिरोडकार यांनी प्रास्ताविकाद्वारे भूमिका मांडली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिमाताई इंगोले यांच्या संदेशाचे वाचन त्यांनी केले. यावेळी प्रेमलता कावळे व प्रा. माधव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी मानले.
कार्यक्रमाला मोहन काळे, प्रा. पुंडलिक भामोदे, डॉ. शांतीलाल चव्हाण, शीला घरडे-पाटील, लता कराळे, प्रकाश अंभोरे, दिनेश गावंडे, संघदास वानखडे, मिलिंद सभापतीकर, अनिल बहाकर, संजय अरबट, सतीश ठाकरे, विवेक मेतकर, संजय वाळके आदिंसह साहित्यिक, रसिकांची उपस्थिती होती.
साहित्य निर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची!
अनेक अडथळ्यांना पार करत पुस्तक प्रकाशित करणे खूप जखमीचे काम असल्याचे प्रदीप खाडे म्हणाले. साहित्य विचारांचा अभंग सागर आहे. यातून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेद्वारे ध्येय्य गाठता येते. त्यामुळे सकस साहित्य निर्मिती होणे गरजेचे आहे, असे विचार डॉ. सुहास उगले यांनी व्यक्त केले. साहित्य निर्मितीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे छाया उपश्याम यांनी सांगितले.
लेखकांना बळ देणे गरजेचे!
साहित्यात आज अनेक प्रवाह आहेत. नवा विचार देणारी पुस्तके प्रकाशित होणे गरजेचे आहे. लेखकाला लिहिण्यासाठी बळ देणे हे इतर साहित्यिकांचे काम आहे, असे विचार पुष्पराज गावंडे यांनी उदघाटीय भाषणात व्यक्त केले. पुस्तक प्रकाशनाबरोबरच वाचक वर्ग निर्माण व्हायला हवा, असे विचार संजय देशमुख यांनी व्यक्त केले. ग्रामीण जनमाणसाचं यथार्थ चित्रण साहित्यातून उमटणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा लता बहाकर यांनी व्यक्त केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....