वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२३-२४ अंतर्गत १ लाख ९८ हजार ५१२ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे.१३ हजार ४५८ शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिक नुकसानीबाबत पुर्व सुचना दिल्या आहे.प्राप्त तक्रारीनुसार शेतकऱ्यांच्या तक्रारीचे सर्वेक्षण करणे चालु आहे.जिल्हयातील सहा तालुक्यातून शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीच्या सुचना प्राप्त होत आहेत.त्यामुळे काही ठिकाणी काही शेतकरी आधी माझे सर्वेक्षण करा,असा आग्रह धरत असल्याचे निदर्शनास येत आहे.प्राप्त पिक नुकसान सुचनांचे सर्वेक्षण विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषि विभागामार्फत नि:शुल्क करण्यात येते.त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांना व भुलथापांना बळी न पडता कोणत्याही व्यक्तीस सर्वेक्षण शुल्क अथवा कोणत्याही कारणास्तव पैसे देवू नये.कोणीही पैशाची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधीत गावचे कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा तहसिलदारांशी संपर्क साधावा.आवश्यकता भासल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संबंधीताविरुध्द लेखी तक्रार करावी.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.