गडचिरोली जिल्ह्यात मोहफूल व साखरेपासून हातभट्टीवर दारु गाळली जाते. हा व्यवसाय अवैधरीत्या केला जातो. यातच सिरोंचा तालुक्यात जुन्या गुळापासून मोठ्या प्रमाणात दारु गाळली जात आहे. तालुक्यातील गर्कापिठा येथे गुळाचा सडवा टाकला असल्याच्या माहितीवरून उपपोलिस स्टेशन बामणी व मुक्तिपथ चमूने धाड टाकून १ लाख ८०
हजार ५०० रुपये किमतीचा गुळाचा सडवा नष्ट केला. गर्कापेठा येथे नव्याने दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अलीकडेच वाढली. त्यांना पोलिसांनी वारंवार सूचना दिली. तरीसुद्धा काही विक्रेते चोरट्या मार्गाने दारूविक्री करीत होते. अशातच हातभट्टी लावून दारु गाळण्यासाठी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथक व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या कारवाई करीत १८ ड्रमगुळाचा सड़वा व साहित्य नष्ट केले. ही कारवाई प्रभारी अधिकारी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पारधी, पोलिस कर्मचारी व मुक्तिपथ तालुका चमूने केली.