जळगाव : सीबीआयमधून बोलत असल्याचे सांगत तीन वर्ष कारावासाची भीती दाखवून एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चाळीसगाव येथील एका महिलेची साडेआठ लाख रुपयात फसवणूक करण्यात आली आहे.
चाळीसगाव शहरातील विवेकानंद कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षीय गृहिणीला ११ जूनला व्हॉट्सॲपवरून फोन आला. त्या व्यक्तीने त्याचे नाव अनिल यादव सांगून सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर एका गुन्ह्यात तुम्ही अडकल्याचे सांगितले. मात्र महिलेने सुरवातीला याकडे दुर्लक्ष केले. नंतर पुन्हा सुनील कुमार नामक व्यक्तीचा फोन आला. त्यानेही आपण सीबीआयचे अधिकारी असून, तुम्हाला ३ वर्षांची शिक्षा होणार असल्याचीही धमकी दिली. यापासून वाचायचे असल्यास साडेआठ लाख रुपये देण्याची मागणी केली.
दोन वेळेस आलेल्या कॉलमुळे घाबरलेल्या महिलेने साडेआठ लाख रुपये तोतया सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. नंतर महिलेने त्या दोघांना फोन केला. मात्र, दोघांचे फोन बंद आले. दरम्यान यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.