शेतकऱ्यांच्या उत्पादन साठवणुकीसाठी गोदाम हे अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गोदाम खरीप हंगामापूर्वी सुस्थितीत आणि दुरुस्त करून घ्या , तसेच या गोदामांमध्ये शेतकऱ्यांना प्राधान्याने त्यांची उत्पादने ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे हे सुनिश्चित करावे असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज जिल्ह्यातील गोदामांविषयी आयोजित आढावा बैठकीत दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब दराडे, जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा उपनिबंधक महेश कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गोदामात साठवणीसाठी ठेवलेल्या उत्पादनाच्या आधारे शेतकऱ्यांना काढणी पश्चात कामकाज करण्यासाठी व तातडीचे आर्थिक गरजा भागविण्यासाठी बँकेकडून अर्थ सहाय्य घेऊन गरजा पूर्ण करता येतात योग्य बाजारभाव येईपर्यंत गोदामात सुरक्षित साठवणुकीची सोय मिळते. तेव्हा जिल्ह्यातील सर्व गोदामांमध्ये शेतकरी बांधवांना प्राधान्य क्रमाने त्यांची शेती उत्पादने साठवण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच ज्या गोदामांची परिस्थिती नादुरुस्त आहे किंवा निकृष्ट दर्जाचा बांधकाम झाल्याचे निदर्शनास येत आहे अशा सर्व गोदामांची दुरुस्ती करून घ्यावी आणि ते सुस्थितीत आहे हे सुनिश्चित करावे आणि याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करावा अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी सर्व तालुक्यातील सहाय्यक निबंधक, बाजार समित्यांचे सचिव, वखार महामंडळ व्यवस्थापक, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक उपस्थित होते.