कारंजा : दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी माऊली इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर कोंडाळा झामरे, वाशिम येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षकाच्या कार्यशाळेत शिक्षक आमदार ॲड. किरणभाऊ सरनाईक, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजय देविदास भड यांच्या ओळख भारतीय शास्त्रज्ञांची या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा माऊली इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर कोंडाळा झामरे येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेला उद्घाटक म्हणून अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड.किरणभाऊ सरनाईक तर अध्यक्ष म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे, प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान भारतीचे नरेश चाफेकर,गिरीश जोशी, रोहन गणोरकर, प्राचार्य सुनील भोईर, प्रभारी विज्ञान पर्यवेक्षक ललित भुरे, विज्ञान अध्यापक मंडळाचे संतोष गिऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक विजय देविदास भड यांच्या ओळख भारतीय शास्त्रज्ञांची या पुस्तकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर पुस्तकामध्ये 15 भारतीय शास्त्रज्ञांची ओळख करून देण्यात आलेली आहे. भारतीय शास्त्रज्ञांचा परिचय त्यांनी लावलेले शोध, त्यांना मिळालेले पारितोषिके इत्यादी माहिती दिलेली आहे. तसेच याप्रसंगी उपक्रमशील शिक्षक, आयडॉल शिक्षक विजय भड यांचा उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी वाशिम जिल्ह्यातील 174 विज्ञान शिक्षक कार्यशाळेला उपस्थित होते.