वसुधैव कुटूंबकम् संकल्पनेतून अवघ्या विश्वाची आणि सुदृढ कुटूंबव्यवस्थेतील घराघरातून सामाजिक आनंदाचे नंदनवन निर्माणाची स्वप्ने पाहणाऱ्या आमच्या कौटूंबिक संस्कृतीप्रधान देशालाच वैचारीक प्रदुषणाच्या कलहाने ग्रासल्याचे चित्र आज समाजव्यवस्थेत निर्माण झाले आहे.आज विविध तापदायक आणि अस्थिर जीवनप्रवासाच्या कलहात माणूस माणसाचा राहिलेला नाही.मानवी जीवन काय आहे हे ओळखून,आयुष्यात गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर स्वतःच स्विकारलेल्या नावाड्याच्या जबाबदारीला न्याय देऊ शकत नाही.त्यामुळे संपूर्ण परिवाराच्या जीवन नौकेला योग्य दिशा देऊन कसे वल्हवावे यांच्या कौशल्यात माणूस पराभूत होत आहे.
मानवी जीवन मुल्ल्यांचा अंगीकार करून दोन पावलं मागे आणि त्यानंतर आनंदी यशाच्या उपलब्धीसह गतीमान मुसंडी मारण्यासाठी अधिक चार पावलं पुढे कसे, केव्हा आणि कशा परिस्थितीत जावे हेच त्याला समजेनासे झाले आहे.म्हणून समाजव्यस्थेतील अनेक कुटूंबे निर्णयक्षमता हरवून मानसिक अशांतीने विनाशाच्या मार्गाने वाटचाल करीत आहेत.जीवन हे आपला आणि नात्यागोत्याचा परिवाराचे नंदनवन असते.तो परस्परांच्या सहकार्याने, प्रेमशक्तीच्या ऊर्जेने यशाच्या महासागरात निश्चित ठीकाणी पैलतीराकडे जाण्यासाठी नियतीने बहाल केलेला एक अनमोल उपहार असतो..त्या उर्जेचा योग्य विनियोग करून घेत स्वतःसोबत परिवारातील सदस्यांचे जीवन समृध्द करीत समाजातील ईतरांच्याही प्रगतीसाठी आपल्या समाजसाधनेचे योगदान मनुष्याने द्यावे हा नियतीला अभिप्रेत असलेला विधायक उदात्त उद्देश आहे. कुटूंबव्यवस्थेतील संभाव्य चिंताजनक विषयाकडे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे आज विवाह संस्कारातून गृहस्थाश्रमात प्रवेश करणारी तरूण दांपत्येच अविवेकाने या परिस्थितीचे बळी ठरत आहेत.राज्यात कौटूंबिक कलहांच्या प्रमाणात लक्षणिय वाढत झाल्याने न्यायालयांवरील ताण वाढत असून निवाडे होण्यास विलंब लागत असल्याने ही प्रकरणे जास्त चिघळत आहेत.त्यामुळे सरकारने आता महाराष्ट्रात अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविसांनी दिली आहे.त्यासाठी पाच वर्षांसाठी स्थापन केलेली न्यायालये सुध्दा कायमस्वरूपी आणि काही अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयांच्या बांधकामाला सुरूवात झालेली आहे.
आज समाजात चाळीशीपलिकडे जाणारी असंख्य जोडपी सुध्दा समजुतदारपणाच्या अभावाने आणि अहंकारी वृत्तीच्या अतिरेकाने एकमेकांचा त्याग करून घटस्फोटांच्या उंबरठ्यावर उभी आहेत.परंतू आता नवविवाहीत दांपत्त्यांचेच विवाहानंतर दोन चार वर्षांतच विलग होण्याचे प्रमाण हे कुटूंब आणि समाजव्यवस्थेला स्वास्थ्याला बसणारे हादरे आहेत. घराघरातून मुला मुलींवर संस्कार करण्यात अपयशी ठरलेले मातापिता हे कौटुंबिक कलहाला कारणीभूत असणाऱ्या अनेक कारणांपैकी एक प्रबळ कारण आहे.दुसरी गोष्ट आज मुलं मुली दोघंही कमावती झालेली आहेत.त्यामुळे आपण स्वतंत्र आहोत,नवऱ्यावर अवलंबून नाही.या मुलींमध्ये निर्माण झालेल्या जाणीवेचे रूपांतर त्यांच्या अहंकारामध्ये होत आहे.त्यात बहूतांश कायदे हे महिलांच्या बाजूने असल्यामुळे त्यांच्या दुरूपयोगातूनही षुरूषांना जळण्याची कारस्थाने महिलांकडून होत असतात.प्रेम,सेवा,सौजन्न्याचा समजूतदारपणा या गोष्टी संस्कारातून स्वभावामध्ये पाहिजे त्या प्रमाणात नसल्यामुळे एकमेकांना समजून घेण्याच्या समजूतदारपणाचा अभाव ही बाब नवविवाहीत मुली आणि पोक्त महिला आणि पुरूषांमधील घटस्फोटाला कारणीभूत ठरते.हा सुध्दा कूटूंबव्यवस्थेला लागलेल्या ग्रहणाचा एक सबळ परिणामकारक वेध आहे.
एका हाताने टाळी वाजत नाही,त्याचप्रमाणे एका नाण्याला दोन बाजूही असतातच.कुटूंबव्यवस्थेच्या या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे पुरूषप्रधान संस्कृती अजूनही कायम असल्याने मोठ्या प्रमाणात वाढत जाणारा पुरूषी अहंकार...! बायको कमावत जरी असली तरी घरात आल्यावर तिने आपल्या म्हटल्यानेच ऐकले पाहिजे.आपलेच प्रस्ताव स्विकारले पाहिजे.तिचे स्वातंत्र्य,ईच्छा,आवडी निवडी याला काहीही स्थान न देता प्रत्येक ठीकाणी आपलीच घोडी सुसाट दामटणाऱ्या तरूणांमधील तडजोडीचा अभाव आणि व्यसनाधिनतेतून अतिरेकी दबाबवतंत्रे त्यांना घटस्फोटाच्या अविवेकी निर्णयापर्यंत पोहचवत आहेत.
स्त्री पुरूषांच्या अति ताठर वृत्ती प्रमाणेच कौटुंबिक जीवन उध्वस्त होण्यामध्ये मोबाईल आणि सोशल मिडिया,घराघरातील टी.व्ही.व्दारे दाखविले जाणाऱ्या खलनायिकी विध्वंसक कौटूंबिक सिरियल, त्याचप्रमाणे मुला,मुलींच्या आई वडीलांकडून त्यांच्या संसारात होणारे अवाजवी हस्तक्षेप या कारणांनी सुध्दा कुटूंब व्यवस्थेवर अवकळा येण्याची संकटे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहेत.पूर्वी मुली दिवाळी,आषाढी अशा सणांनाच माहेरी येत होत्या.त्यामुळे आई-वडील आणि नातेवाईकांना त्यांच्या घरातील गोष्टी जाणून घेऊन त्यांना उलट्या सुलट्या सल्ला देण्यासाठी वेळ मिळत नव्हता.परंतू आता मोबाईल चे प्रमाण अफाट वाढल्याने सकाळ,दुपार संध्याकाळ मुला मुलींच्या ख्याली खुशाली विचारणारे अति प्रेमळ मातापिता आणि रिकाम्या नातेवाईकांच्या प्रमाणातही लक्षणिय वाढ आहे.त्यात घरातील कामे किती करावित, सासू, सासरे,दिर,नणंदांशी कसे वागावे,जशास तसे कसे रहावे, असे जास्तीचे संस्कार,आणि प्रेम,सेवाभाव या गृहस्थी कर्तव्यधर्माला विसरायला लावणाऱ्या शिकवण्या,तथा फुकटचे सल्ले विनामुल्य सुरू असल्याने मुलं मुली भरकटली आहेत.त्यामुळे होणारी दिशाभूल आणि पसरत चाललेले गैरसमज अनेक जोडप्यांना घटस्फोटाच्या दरवाज्यापर्यंत नेऊन पोहचवत आहेत.
फोफावलेल्या मोबाईल संस्कृतीत सतत मोबाईलवर बोलणारे नवरे आणि बायका सुध्दा एकमेकांबद्दल संशयकल्लोळाने ग्रासले असतात.त्यामुळे अतिरिक्त नजरा ठेवणे.एकमेकांचे मोबाईल पाहणे.मग गडबड नसली तरी काही तरी आहेच्या संशयाने एकमेकांचा मानसिक छळ करणाऱ्या नवरा बायकांना सात जन्म तर कधीच नव्हे, परंतू आलेल्या जन्मातही संपूर्ण वैवाहिक जीवन यशस्वी करण्याचं भाग्य लाभत नाही. हा निरोगी समाजस्वास्थावर कोसळणारा संकटांचा डोंगर आहे.
ही परिस्थिती बदलून नवविवाहीत आणि त्यापुढील कुटूंव्यवस्थेत काडीमोड होण्याच्या या संकटाचा प्रभाव कमी व्हावेत.यासाठी विवाहितांमध्ये वास्तव जीवनातील मानवी जीवनमुल्यांचे,मानवी कौटुंबिक धर्मकर्तव्याचे महत्व समजून घेण्याबाबत चिंतन झाले पाहिजे. त्यानुसार विवेकी वाटचाल करून ही संकटं टाळण्याचे प्रयत्नातच विजय असतो.आई वडीलांनीही मुला मुलींच्या किंवा वयाने त्यापलिकडे गेलेल्या विवाहीतांच्या जीवनातील आपले हेकेखोरीचे अवाजवी हस्तक्षेप थांबविले पाहिजेत. मोबाईल, टीव्ही,सोशल मिडीयाला जेवणाच्या मीठ किंवा लोणच्याप्रमाणेच वापरण्याची सुधारणा करून घेतली पाहिजे.कारण ज्या गोष्टी आनंदी जीवनाला हानिकारक ठरतात, त्यांना नियंत्रित करून आपल्या जीवनशैलीमध्ये त्यानुसार बदल करणे ही साधी समज आहे.मानवी जीवनात निराशा पत्करून कौटुंबिक कलह टळले पाहिजेत. मानसिक शांती घालवून मनाचे आजार ओढवून घेण्यापेक्षा घडणाऱ्या विनाशासाठी ईतरांना दोष देण्यापेक्षा आपणच आपल्यात आपल्या स्वतःसाठी बदल घडवून आपले जीवन अधिक आनंदी...उन्नत...समध्द बनविण्याचे प्रयत्न आपणच का करू नये?
आपल्या प्रतिक्रिया द्या....