अकोला- अनादी काळापासून या देशात समता व विषमतेचा तीव्र लढा सुरू असून त्याला अद्यापही यश आले नाही. एकीकडे विषमतेचे समर्थन करणारी मंडळी समाजात असून दुसरीकडे विरोध करणारी मंडळी आपणास दिसून येते.समता प्रस्थापित करण्याच्या संदर्भात अनेक लढाया व क्रांती या देशात झाली. अगदी विदेशातही फ्रेंच क्रांती सारखी समतेची लढाई झाली. तथापि क्रांती ही समतेची परिचायक असून ती विषमतेवर मात करणारी बाब असल्याचे मत पुणे येथील व्याख्याता अन्वर राजन यांनी व्यक्त केले. बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने स्थानीय प्रमिलाताई ओक सभागृहात सुरू असलेल्या 9 दिवसीय नवरात्र व्याख्यानमालेचे अन्वर राजन यांनी सातवे पुष्प गुंफले.समतेच्या दिशेने या विषयावर त्यांनी आपल्या व्याख्यानात ऊहापोह केला.ते पुढे म्हणाले, समता -विषमतेचा प्रारंभ अगदी वेद व यज्ञ संस्कृती पासून निर्माण झाला आहे. वेदांमध्ये मूर्तिपूजन असून निसर्गाशी तादात्म पावणारी पूजा विधि चा यात उल्लेख आहे. तसेच त्यामध्ये पुरुष सुक्तापासून मनू स्मृतीचा जन्म होताना दिसत आहे. ज्या बाबी पुस्तकात आहेत,त्या प्रत्यक्ष समाजात अस्तित्वातच होत्या.ते म्हणाले,तत्कालीन युगानंतर मानवी समाज हळूहळू विकसित होत गेला. टोळ्या निर्माण झाल्यात. त्या टोळ्यांच्या अधिपती या स्त्रिया गणल्या गेल्यात. वैचारिक मेंदू ही निसर्गाने माणसाला दिलेले मोठी देणगी ठरली. दाण्यावरून कृषी चा शोध लागला. नंतर पशुपालन निर्माण झाले.टोळीवरून पुढे कुटुंब संस्था निर्माण झाली, त्याची परिमिती विवाह व पती-पत्नी संस्थामध्ये झाली. मात्र अनेक युग गेल्यावर ही स्त्री पुरुष समतेपर्यंत आपण अद्यापही पोहोचलो शकलो नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.समतेच्या दिशेचा हा प्रवास अद्यापही संघर्षाच्या रूपाने सुरू असून जातीव्यवस्था ही समाज जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. जातिव्यवस्था संपवावी ही सर्वांची भूमिका अनादी काळापासून सुरू असून मात्र प्रत्यक्ष अमलात येऊ शकली नाही. तत्कालीन व्यवस्थेत जैन व बौद्ध विचाराने वर्णव्यवस्थेचा विरोध केला. यात संत संप्रदायाची पण भूमिका मोठी महत्त्वाची असल्याचे अन्वर राजन यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले,समाज सुधारणेच्या संदर्भात संतांची मोठी भूमिका आहे. मात्र त्यांचा आवाज या संदर्भात मर्यादित होतं गेला. संतांनी समाज जागृतीचे मोठे काम केले, यानंतर महात्मा फुले यांची सामाजिक क्रांती ही समाज ध्रुवीकरणासाठी मोठी उपलब्धी ठरली आहे. समाज जागृती व समतेचा मोठा टप्पा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाती संस्थेच्या विध्वंसिकरणापासून सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. आज देशात समाज सुधारणेच्या संदर्भात अनेक संस्था संघटना अव्याहत व प्रभावीपणे काम करीत असून जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करणे हे या संस्था, संघटनांचे महत्तकार्य असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे अन्वर राजननी यांनी यावेळी सांगितले. व्याख्यान प्रारंभी त्यांनी इंदिरा गांधी व आणीबाणीची भूमिका मांडली. भारत-पाक युद्धात श्रीमती इंदिरा गांधी यांचा काणखरपणा जगाने बघितला असल्याचे सांगितले. इंदिरा गांधी यांच्या राजकीय व्यवस्थेला जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने छेद दिला. इंदिरा गांधी यांचे वर्णन अटल बिहारी वाजपेयी यांनी साक्षात दुर्गा मातेच्या स्वरूपात केले असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे इंदिरा गांधीच्या माध्यमातून हुकूमशाही व्यवस्था निर्माण होत गेल्यामुळे जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाच्या रूपाने प्रतीक क्रांती या देशात निर्माण होऊन आणीबाणी या आणीबाणीच्या रूपाने वेगळी विचारसरणी एकत्र होऊन या विशिष्ट विचारसरणीने जयप्रकाश नारायण यांच्या विचारांना तिलांजली देऊन जातीयवादी शक्तीचे रूप घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. जयप्रकाश नारायण यांची समाजवादी भूमिका व त्यांच्या वैचारिक अधिष्ठांनाना अवतीभवती जमलेल्यांनी तिलांजली दिली असल्याचे त्यांनी सांगितले.सत्र प्रारंभी सर्वप्रथम बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, सचिव अनुराग मिश्र यांनी व्याख्याता अन्वर राजन यांचे मोमेन्ट व पुष्पहार देऊन स्वागत केले. प्रास्तविक सचिव अनुराग मिश्रा यांनी तर वक्ता परिचय जेष्ठ कविवर्य नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी केला.या व्याख्यान मालेत आज शनिवार दि.11 ऑक्टोंबर रोजी पुन्हा अन्वर राजन हे हिंदू, मुस्लिम प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर व्याख्यान देणार आहेत.दि 12 ऑक्टोंबर रोजी पुणे येथील नितीश नवसागरे यांच्या भारतीय संविधानाची 75 वर्ष या विषयावरील व्याख्यानाने या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. महानगरातील व्याख्यान प्रेमी श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घेण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, सचिव अनुराग मिश्र समवेत सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले.