कारंजा (लाड) : राज्याच्या हवामान विभागाने,अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देवूनही स्थानिक स्वराज्य संस्था नगर पालिकेने हवामान विभागाचा आदेश गांभिर्याने घेतला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी बुधवार दि. १४ मे २०२५ रोजी झालेल्या पहिल्याच पावसाने नगर परिषदेचे वाभाडे निघाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, सद्यस्थितीत अरबी समुद्रा पासून तर बंगालच्या उपसागरा पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळी वारे वहात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच कोठे जोरदार ते अतिजोरदार आणि काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पूर्व मोसमी,वळवाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सदरच्या इशाऱ्याची स्थानिक स्वराज्य संस्थेने गांभिर्याने दखल घेऊन, उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तशी यंत्रणा तयार ठेवणे आणि व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक होते.मात्र या आपत्ती व्यवस्थापन विषयाकडे नगर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष्य असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने शिवाजी महाराज पुतळा चौक,डॉ आंबेडकर चौक,इंदिरा गांधी चौक येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी येऊ नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. शिवाय आरोग्य विभागाकडून साफसफाई कडे दुर्लक्ष असल्याने नाल्यामधून मोठया प्रमाणात घाण व केरकचरा रस्त्यावर जमा झाला होता. पाहिल्याच पावसात काणाव जीन मधील दुकानातील प्लॉस्टिक ड्रम आणि बाजारपेठेमधील शेतकरी व अडत्यांचा भाजीपाला वाहून त्यांचे देखील नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सद्यस्थितीत रामा सावजी चौक ते जुना सरकारी दवाखाना चौकातील नव्याने बांधकाम केलेल्या मोठमोठ्या नाल्यांवर झाकणं टाकण्याची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे एखादेवेळी भर पावसात पादचारी नालीत पडून वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे एखाद्याची जीवीत हानी होण्यापूर्वी याचा बंदोबस्त करण्याची मागणी कारंजेकरांकडून होत आहे. शिवाय येत्या आठवड्यात जोरदार ते अतिजोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने निदान आता तरी नगर पालिकेने पावसाळ्या पूर्वीची कामे उरकवून साफसफाई कडे लक्ष्य देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.