अकोला; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व मतदार साक्षरता अभियानाचे ब्रँड अँबेसेडर डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण अकोला जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. डॉ.कोरडे यांच्या राष्ट्रीय उपक्रमाला शहरी विभागाबरोबरच ग्रामीण विभागातून हि भरभरून प्रतिसाद मिळत आहे.*दि :१६ एप्रिल २०२४ रोजी म्हातोडी व घुसर या ग्रामीण परीसरात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला सहकारी विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त आयोजनातून ब्रँड अँबेसिडर डॉ.कोरडे यांच्या मार्गदर्शनात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले*. अभियानाची सुरुवात सहकारी विद्यालय म्हातोडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देऊन करण्यात आली . ग्रामपंचायत च्या परिसरात गावातील ज्येष्ठ नागरिक , नवमतदार , महिला , शिक्षक , आरोग्य कर्मचारी , अंगणवाडी सेविका व दिव्यांग मतदार यांनी 26 एप्रिल रोजी मतदान करण्याचा संकल्प घेतला . या कार्यक्रमात गावातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित मतदार साक्षरता अभियानात सहभाग नोंदवून आम्ही मतदान करणार अशा घोषणा दिल्या . डॉ.कोरडे यांनी आपल्या मार्गदर्शनात दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीचा कसा उपयोग होऊ शकतो ? याचे प्रात्यक्षिक दिले . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अस्मिता मिश्रा व अमित सोळंके यांनीही दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली. *ज्या दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहन हवे आहे त्यांनी ९४२३६५००९० या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली* . सहकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.राजेश शेंडे यांनी अग्रणी दूत डॉ.कोरडे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन कला शिक्षक श्री.योगेश शेलकर यांनी तर आभार दिव्यांग मतदार घनःश्याम भांडे यांनी मानले. दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे म्हातोडी गावातील प्रत्येक घरात जाऊन मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद इंगळे, धनराज राठोड, योगेश शेलकर, संस्थेचे सदस्य अनामिका देशपांडे,गणेश सोळंके, सिद्धार्थ ओवे, सुजाता आसोलकर, विजय कोरडे व विशाल भोजने यांनी सहकार्य केले.