"गोंधळी" ही लोककला अत्यंत प्राचिन, ऐतिहासिक व पारंपारिक लोककला आहे. भारतिय पौराणिक ग्रंथ देवीमहात्म्य, देवी पुराण, वेद उपनिषदापासून तर महाराष्ट्रियन संताच्या तुकारामाची गाथा, एकनाथी भागवत, शौर्यगीते,पोवाड्या, अभंगामधून, कुळाचाराच्या पूजेकरिता व कुलस्वामिनीला प्रसन्न करून घेण्याकरीता गोंधळ्यांद्वारे जागर गोंधळ करून गोंधळाची पूजा करण्याविषयी सांगीतले आहे. गोंधळी हे अतिशय मनमोकळ्या स्वभावाचे, सत्य इतिहास मांडणारे, हिंदुधर्मियातील विविध जाती जमाती समाजाची वंशावळी लिहून ठेवणारे, शिव आणि शक्तिचे उपासक व पुजारी आहेत. यातील शिवशंकराचे पुजारी असलेले गोंधळी हे गुरव म्हणून ओळखले जातात. तर आदिशक्ती अंबाबाईचे पुजारी गोंधळी म्हणून ओळखले जातात. गोंधळी गुरव यांचा पूर्वापासून रोटी-बेटी असा सामाजिक संबंध आहे. पूर्वी राजे महाराजांच्या संस्थानांमध्ये गोंधळ्याना शिवाचे किंवा अंबाबाईचे पुजारी म्हणून ठेवण्यात येत होते. व संस्थानांकडून यथोचित मानपान दक्षिणा दिल्या जात होती.मात्र पेशवाईच्या काळामध्ये गोंधळी समाजावर ब्राम्हण समाजाकडून अन्याय केला जाऊन गोंधळी समाजाला परागंदा व्हावे लागले. गोंधळी समाज भोळा भाबळा आणि आशिक्षित असल्याचा लाभ घेऊन ब्राम्हण समाजाकडून त्यांच्या ताब्यातील मंदिर व संस्थाने स्वतःच्या अखत्यारीत करून घेतल्या गेलेली आहेत. याचे साक्षी पुरावे म्हणजे आजही प्राचिन व ऐतिहासिक असलेल्या सुप्रसिध्द प्रत्येक शिवमंदिरा सभोवती गुरव समाजाची घरे किंवा मोहल्ला आणि प्रत्येक पुरातन अंबाबाईच्या म्हणजेच देवीमंदिरा सभोवती किंवा संस्थानांजवळ गोंधळीपूरा आढळून येऊन, जेथे जेथे देवीचे मंदिर. तेथे तेथे आजूबाजूला, कित्येक पिढ्यानपिढ्या पासून असलेली गोंधळ्याची घरे व स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगर पालिकेत गोंधळ्यांच्या वस्तीचा उल्लेख हा आढळून येतो. छत्रपती शिवरायांच्या काळात, निजामशाही, मोगलशाही सोबत लढतांना कित्येक गोंधळी मावळ्यांना विरमरण आलेले होते. याची नोंद व मंदिर संस्थानांची माहिती आजही हैद्राबाद येथील निजाम संस्थानच्या दफ्तरी नोंद असल्याचा उल्लेख आहे. शिवरायाच्या सैन्यात गोंधळी मावळे सहभागी होते. हिंदुधर्मियाच्या मराठा समाजातील गोंधळी ही पोटजात आहे आणि पूर्वीचे गोंधळी हे लढवय्ये होते. गोंधळ्यांनी हिंदवी स्वराज्यात हेरगिरी करून महाराजांचे गुप्तहेर म्हणून सेवा दिल्याचाही इतिहास आहे. गोंधळ्यांना करपल्लवी, नेत्रपल्लवी आणि मशालपल्लवी ह्या भाषा अवगत होत्या. आणि स्वराज्याकरीता, आपल्या महाराष्ट्रात गोंधळ्यांनी ह्या सांकेतिक भाषांचा प्रयोग केल्याचा इतिहास जीवंत आहे. गोंधळी समाज हा खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनकार असलेला जातीवंत लोककलाकारांचा समाज आहे. हिंदुधर्मीयांमध्ये गोंधळी समाजाला गुरुस्थानी मानले जाते.प्रत्येक मातृशक्ति उपासकाच्या घरी गोंधळ्याद्वारे पूजाअर्चना करून वास्तूशांती, गृहशांती, नवजात बाळाचे बारसे, शुभ विवाह प्रसंगी, नवरात्रोत्सवामध्ये आणि संकट समयी निर्विघ्न बाहेर पडल्यानंतर नवस फेडण्याकरीता गोंधळ जागरण करण्याची पुरातन प्रथा आहे. पूर्वी गाव वस्त्या वाड्यांवरील शेतकरी आपल्या शेतातील पिकधान्य गोंधळ्यांना जोगव्याचे दान देण्याकरीता वेगळे काढून ठेवीत होते. गोंधळ्यांना दान दिल्यामुळे पितरांचा उद्धार होऊन पितृऋणामधून मोक्ष मिळत असल्याची श्रद्धा असते. शिवाय गोंधळी समाज संपूर्ण आयुष्यभर आपल्या लोककलेद्वारे समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती- अंधश्रध्दा निर्मूलन व राष्ट्रीय कार्यक्रमाच्या जनजागृती करीता आपले जीवन समर्पीत करीत असतो. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. व गोंधळी ह्या लोककलेचा वारसा, आपल्या महाराष्ट्राने, आपल्या समाजाने, मातृशाक्ती उपासकांनी जतन केला पाहीजे. असे आवाहन संजय म. कडोळे, (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) जिल्हाध्यक्ष : महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना, कारंजा (लाड) जि. वाशिम. मो 8263039327 यांनी केले आहे .