वाशिम - रिसोड तालुक्यातील ग्राम चिखली ते व्याड या ५ किलोमिटरच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून या रस्त्याच्या नविनीकरणाचे काम तातडीने करावे अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल अशा इशारा वंचित बहूजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. सोमवार, २३ ऑक्टोंबर रोजी जिल्हाध्यक्ष सौ. किरणताई गिर्हे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, रिसोड तालुक्यातील ग्राम चिखली ते व्याड हा ५ किमी. चा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडला गेला असून ग्रामस्थांना या रस्त्यावरुन पाणी चालणे सुध्दा कठीण झाले आहे. सदर रस्त्याचे काम गेल्या १० वर्षापासून करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्यावर अवलंबून असलेल्या चिखली, व्याड या गावासह आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांना अनेक त्रासाचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अनेक अपघात होवून ग्रामस्थ जखमी झाले आहेत. आपातकालीन परिस्थितीत या रस्त्यावरुन रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी नेतांना नातेवाईकांना अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी दिलेल्या अनेक निवेदनावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. तरी सदर रस्त्याच्या नविनीकरणाचे काम येत्या आठ दिवसात सुरु करावे अन्यथा वंचित बहूजन आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लोकशाही पध्दतीने तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतांना वंचितच्या जिल्हाध्यक्षा सौ. गिर्हे यांच्यासह जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जि.प. सदस्या सौ. कल्पना राऊत, तालुका अध्यक्ष गोपाल पारीसकर, सदानंद गायकवाड, राहुल मैंदकर यांच्यासह महिला आघाडी व युवक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.