वाशिम : अमरावती विधान परिषद मतदार संघाचे लोकप्रिय व सर्वांचे लाडके असलेले शिक्षक आमदार अॅड .मा. किरणरावजी सरनाईक यांना शालेय शिक्षण घेत असतांनाच आपल्या मातोश्री कडून साहित्य, कला, शिक्षण, समाजसेवा व राजकारणाचे बाळकडू मिळालेले होते . आणि त्यामुळे त्यांनी आपल्या जीवनात सदैव राजकारणापेक्षा समाजसेवेलाच प्राधान्य दिले असल्याचे त्यांचे निकटवर्ती असलेले संजय कडोळे नेहमीच आपल्या बोलण्यातून सांगत असतात. तर अशाच आपल्या सामाजिक उपक्रमातून वाशिम जिल्हयातील सर्वच जिल्हावासियांना सुदृढ व चांगल्या आरोग्याचा मंत्र देण्याच्या उद्देशाने शिक्षक आमदार अॅड किरणराव सरनाईक यांनी, दि .२ जून रोजी सांय ०६:०० वाजता, पुणे येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व स्वतः अनुभवातून विश्वासाने निःस्वार्थ मार्गदर्शन करणाऱ्या निसर्गोपचार तज्ञ - वैद्य स्वागतजी तोडकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजीत केला होता. या कार्यक्रम स्वागताचे वैशिष्ट असे होते की, कारंजा तालुक्यातील लोहारा येथील, बंजारा महिला लोककलांवतच्या पारंपारिक लोकनृत्याद्वारे स्वागतजी तोडकर यांचे स्वागत करण्यात आले होते असे वृत्त प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळवीले आहे .
प्रारंभी शिक्षक आमदार तथा निसर्गोपचार तज्ञ स्वागतजी तोडकर यांचे हस्ते,आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचे पूजन व हारार्पण करण्यात आले त्यानंतर आमदार सरनाईक यांनी आपल्या प्रास्तविकातून व्याख्यात्यांचा परिचय करून दिला . यावेळी उपस्थित हजारो निसर्गप्रेमी नागरिकांसमोर बोलतांना अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दात व्याख्याते स्वागतजी तोडकर यांनी निसर्गोपचाराचे महत्व पटवून दिले . ते म्हणाले, "आपले आरोग्य जपण्याकरीता प्रत्येकाने उद्या काय होईल ? असा उद्याचा विचार न करता आजच्या दिवसाचे जीवन तणावमुक्त आणि आनंदाने जगलं पाहीजे . तन्दुरुस्त राहण्याकरीता व्यायामाला प्राधान्य दिलं पाहीजे . नव्हे प्रत्येकाने व्यायामावर भर दिला पाहीजे . आहाराविषयी बोलतांना ते म्हणाले, " बर्जर - पिझ्झा - फास्ट फूड - तळलेले पदार्थ खावूच नये . तसेच आपल्या तोंडातील दाताचा व्यायाम होण्याकरीता कडक अन्न पदार्थ चणे, ऊस वगैरे चावून - चावून खाल्ले पाहिजेत . तसेच उपवास वगैरे बकवास आहे. दिवसातून चार पाच वेळा थोडे थोडे अन्नपदार्थ आपण खाल्ले पाहीजेत. दवाखान्याचा ताणच घेऊ नये . जास्त गोळ्या - औषध घेऊच नये . निसर्गोपचार म्हणजेच आयुर्वेदिक औषधं घातक नसतात . आयुर्वेदामधील बरीच औषधं आपल्या स्वयंपाकगृहातच असल्याचेही त्यांनी पटवून देतांना दालचिनी, तेजपान, सुंठ, मिरी, हळद, लसून, पुदिना, कोशिंबीर इत्यादींच्या काढ्याची माहिती दिली. वर्षातून एखाद्यावेळी तरी शरिराच्या सर्व्हिसिंग करीता, तिन दिवस फक्त आणि फक्त ताक आणि पाणी पिऊन शरिर स्वच्छ ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला . " गाव - परगावाहून आलेले हजारो श्रोते शांत चित्ताने मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतांना दिसत होते . यावेळी स्वतः शिक्षक आमदार किरणराव सरनाईक, भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव, भाजपाचे लॉ . वसंतराव धाडवे, हभप श्रीकृष्ण पाटील राऊत, पत्रकार निलेश सोमाणी, पत्रकार संजय कडोळे प्रेक्षक श्रोत्यांमध्ये बसून व्याख्यानाचा आनंद घेत होते . यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे, कार्यक्रमाला येणाऱ्या हजारो श्रोत्यांकरीता दुपारी ०४:०० ते रात्री ९ :30 पर्यंत, थंडगार पन्ह्याची व्यवस्था करण्यात आली होती .