कारंजा बाजार समिती निवडणूक होणार चुरशीची ; मतदारांच्या चर्चेतून परिवर्तनाची नांदी
स्व.प्रकाशदादा डहाके यांचा दबदबा राहीला नाही ; बाजार समिती असणार त्रिशंकू.
कारंजा (लाड) : वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तालुक्यातील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कारंजा (लाड) तालुक्यात एकीकडे उन्हाळ्यात उन्हाचे चटके बसत असतांना, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या तापमानातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.या निवडणुकीच्या रिंगणात १६ सदस्यांच्या निवडीसाठी चारपैकी ७० उमेदवार रिंगणात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या निवडणुकीत २३२० मतदार मतदान करणार आहेत.३० एप्रिल रोजी ही निवडणूक होणार असून,त्याच दिवशी मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेश ढोंबडे यांनी दिली.या निवडणुकीत चार गटांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे.या निवडणुकीच्या मैदानात दिवंगत माजी आमदार स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या पत्नी सईताई डहाके मैदानात आहे. त्यांचे पॅनल करीता माजी न.पा. नगराध्यक्ष दत्ताभाऊ डहाके, युसूफ पुंजानी इत्यादी सहकार क्षेत्रातील मातब्बर जाणकार मंडळींना घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.तर दुसरीकडे आमदार राजेंद्र पाटणी आणि सहकार नेते सुनिल धाबेकर एकत्र येऊन पॅनल लढवीत आहेत, तिसरीकडे वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ही आपला पॅनल मैदानात उतरवीला आहे. शिवाय समाज क्रांती आघाडीचे हंसराज शेंडे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत पॅनल उभे केल्याचे दिसून येते.परंतु असे असले तरी प्रत्येक गटात दुफळीचे दृश्य पाहायला मिळत आहे.त्यामुळे दोघांच्या मतभेदात तीसऱ्याचा लाभ होऊ शकतो असे वाटत आहे.प्राप्त माहिती नुसार सहकार क्षेत्रातील जुण्याजाणत्या नेत्यांना घाम फुटला आहे.सर्वच पॅनलचे नेते,कार्यकर्ते या निवडणुकीसंदर्भात ठिकठिकाणी कॉर्नर सभाही घेत आहेत.
त्याचबरोबर निवडणुकीपर्यंत मतदारांना गुंतवून ठेवण्यासाठी ठिकठिकाणी जेवणावळ्या करून मतदारांना आकर्षित करण्यात येत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.यावेळी अनेक उमेदवार नव्यानेच निवडणूक रिंगणात नशीब अजमावित असून,उमेद्वारांचा कल साम-दाम वापरून खेळी खेळण्याचा दिसून येत आहे. विजयाचा शिलेदार नक्की कोण ? हे आज सांगता येत नाही.गेल्या वर्षानुवर्षे बाजार समितीवर एकहाथी वर्चस्व ठेवणाऱ्या स्व प्रकाशदादांचा वेगळाच रुबाब होता.त्यांची सर आज येऊ शकत नाही.तसेच स्व प्रकाशदादांचे एकेकाळीचे सहकारी असुंतष्ट असल्याने इतर पॅनलमध्ये विभागले गेल्याने ही निवडणूक जड जाणार असल्याचे जरी बोलले जात असले तरी सुद्धा स्व प्रकाशदादांना मानणारी मतदार राजाची फार मोठी संख्या शेतकरी वर्गामध्ये आहे.शिवाय ग्रामिण भागातील सर्वाधिक सहकारी संस्था सुद्धा त्यांचे पॅनलकडे असल्याचे वृत्त आहे. असे असले तरी काही उमेदवार सदर्हू निवडणूक प्रतिष्ठेची करीत,आपला विजय निश्चित करण्यासाठी स्वबळावर प्रचारयंत्रणा राबवीत आहे. मागील कारंजा (लाड) कृषी उत्पन्न बाजार समितीत,गेल्या २५ वर्षांपासून माजी आमदार दिवंगत प्रकाशदादा डहाके यांच्या गटाची सत्ता असून यावेळी मात्र कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर डहाके गटाचा झेंडा फडकणार की सत्ता परिवर्तन होणार ? अशी मतदारामध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे.विरोधकही आपल्या स्तरावर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.या निवडणुकीत बाजी कोण बाजी मारणार ? हे लवकरच दि.३० एप्रिललाच मतदानातून दिसणार आहे.
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेवा सहकारी संस्थेचे ७९५ मतदार,ग्रामपंचायतीचे ७५६ मतदार,अडते ३३८ मतदार, व्यापारी १२९ मतदार, हमाल २५० मतदार तर मापारी ५२ मतदार आहेत.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालेले उमेदवार हे सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीमध्ये आपले भाग्य आजमावित आहे.असल्याचे आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळविले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी दिले आहे.