धानोरा, १९ जुलै : जिल्हाभरात मुसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार १८ जुलै रोजी विजेच्या कडकडासह दुपारी आलेल्या पावसामध्ये शेतामध्ये काम करत असलेला एका व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळल्याने एक जण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील कांदळी येथे घडली.
संजय उसेंडी (२८) रा. पोवनी असे मृतकाचे नाव आहे तर उत्तम हिरामण पदा असे जखमीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, पोवनी येथील व्यक्ती संजय देवासा उसेंडी हा कांदळी येथील शेतामध्ये काम करत असताना दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या पावसासोबत वीज पडून ठार झाला तर उत्तम हिरामण पदा हा जखमी झाला. यासह शेतामध्ये पाच ते सहा लोक काम करत असताना त्या लोकांनी संजय उसेंडी याला ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले असता डॉक्टरांनी त्यांला मृत्त घोषित केले तर उत्तम हिरामण पदा (२८) हा जखमी असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे उपचार सुरु आहे. मृत व्यक्तीला चार मुली, एक मुलगा, पत्नी, आई वडील असा बराच मोठा परिवार आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.