गडचिरोली, दि. 27 (जिमाका):
कोटगल (ता. गडचिरोली) येथे दिनांक 26 मे 2025 रोजी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित विविध योजनांच्या जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात राष्ट्रीय मत्स्य विकास प्लॅटफॉर्म नोंदणी, किसान क्रेडिट कार्ड योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, ई-श्रम योजना, अपघात गटविमा योजना, तसेच मासेमारी साधनांसाठी अर्थसाहाय्य आदी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कोटगलसह मुरखळा, मुडझा, हिरापूर व येवली येथील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे सभासद व स्थानिक मत्स्यव्यवसायिक या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक असलेली माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व मार्गदर्शनाद्वारे देण्यात आली.
सदर कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पाच सहकारी संस्थांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत मासळी बीज, खाद्य, जाळी, क्रेट्स, बर्फ पेटी आणि कॅनव्हास तंबू यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर मत्स्यव्यवसायाला बळकटी मिळून रोजगारनिर्मितीस चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
NFDP पोर्टलवर प्रत्यक्ष नोंदणीसाठी मत्स्य विभागाच्या पथकाने सहाय्य केले. उपस्थित व्यावसायिकांनी योजनेचा लाभ घेण्याबाबत उत्साही सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अ.ज्ञा. सोनोन, वरिष्ठ लिपिक योगेश रोकमवार, कनिष्ठ लिपिक विनोद कुनघाडकर व राहुल मेश्राम, डाटा एन्ट्री ऑपरेटर किशोर मोगरकर, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी भुषण साखरे तसेच स्थानिक मत्स्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांनीही यांचे मोलाचे योगदान लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....