कारंजा येथील जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाचे अध्यक्ष आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे, यांनी आज मंगळवारी, जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धवरावजी ठाकरे तसेच सांस्कृतिक मंत्री ना. अमितजी देशमुख यांना विनम्र निवेदन दिले की - "श्रीक्षेत्र पंढरपूर येथील मायबाप श्री विठ्ठल रखुमाईचे चरणस्पर्श दर्शन वारकऱ्यांसाठी खुले करून, हजारो कि . मि . वरून वारीला येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळावी . " याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, कोव्हिड - 19 कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापूर्वी शासन - प्रशासनाने श्रीक्षेत्र पंढरपूर येथील वारकऱ्यांचे मायबाप श्री विठ्ठल रखुमाई यांचे चरणस्पर्श म्हणजेच पदस्पर्श दर्शन बंद केलेले आहे . त्यावेळची परिस्थिती वेगळी होती . तर आताची परिस्थिती अतिशय चांगली आहे . सर्वत्र कोरोना लसिकरण जवळ जवळ १०० % झालेले आहे . आणि कोरोनाच्या रोगराईवर विजय मिळविण्यात शासन यशस्वी ठरले आहे . त्यामुळे शासनाने संचारबंदी, जमावबंदी सारखे निर्णय मागे घेत धार्मिक स्थळांची प्रवेशद्वारे उघडून दर्शनाला मुभा दिलेली आहे . शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक,चित्रपट, खेळाच्या विविध स्पर्धा व क्रिडांगणानांही अनुमती मिळाली आहे . परंतु अद्यापपर्यत मायबाप विठुरुक्मिनी पददर्शनाचा निर्णय घेतलेला नसल्यामुळे, हजारो कि मि वरून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्याचे समाधान होत नाही . त्यामुळे आता शासनाने वारकऱ्यांची जास्त परिक्षा न पाहता श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठुरुक्मिनी पदस्पर्श दर्शनाचा निर्णय जाहीर करावा अशी विनम्र प्रार्थना जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे दिंडीप्रमुख संजय कडोळे यांनी निवेदनाद्वारे केली असल्याचे प्रसारमाध्यमाशी बोलतांना त्यांनी कळविलेले आहे .