कारंजा : भारतातील मातृशक्ति उपासकांचे, आसामच्या गोहाटी स्थित शक्तिपिठाचे महत्व असलेले कारंजा येथील मातृशक्तिचे ऐतिहासिक आणि जागृत असलेले पावित्र शक्तिपिठ, तथा कारंजा नगरीचे आराध्य दैवत आणि कारंजेकरांची कुलस्वामिनी - श्री कामाक्षा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला - आश्विन शुद्ध प्रतिपदा-सोमवार दि .२६ सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून श्री नवरात्रोत्सवात दरवर्षी प्रमाणे पारंपारिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या शक्ति अवताराच्या, श्री कामाक्षा देवीचे संपूर्ण भारतात दोनच ठिकाणी शक्तिपिठं असून एक म्हणजे आसाम राज्यातील गोहाटी व दुसरे म्हणजे विदर्भ राज्याच्या वाशिम (वत्सगुल्म) जिल्ह्यातील, पवित्र शक्तिपिठ करंजपूर ; कारंजा नगरी होय. जगत्जननी श्री कामाक्षा माता ही नवसाला पावणारी, मनोकामना पूर्ण करणारी जागृत ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाते. या मंदिराचा कारभार "महाजन" कुटूंबियांकडे आहे. श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजा येथे स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच भव्य यात्रा भरल्या जाते. मागील दोन वर्ष कोव्हीड १९ कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे श्री कामाक्षा देवीची यात्रा, कारंजा नगरीच्या इतिहासात प्रथमच खंडीत झाली होती. परंतु आता शासन प्रशासनाने मंदिर,सण, यात्रा,उत्सवावरील तात्पुरती बंदी उठवून अनुमती दिल्याने सन २०२२ च्या श्री नवरात्रोत्सवात श्री कामाक्षा देवीच्या यात्रेची परंपरा पुन्हा सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे संस्थानचे अध्यक्ष हभप दिगंबरपंत महाराज महाजन तथा सचिव रोहीत महाजन यांच्या म्हणण्याप्रमाणे शारदीय श्री नवरात्रोत्सवाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे राहतील. सोमवार दि २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी श्रीदेवीचा मंगलाभिषेक व दुपारी घटस्थापना, दुपारी ३:०० वाजता हभप संजय म कडोळे यांचा "गोंधळ जागरण" कार्यक्रम, आश्विन शुद्ध षष्ठी शनिवार दि. १ ऑक्टोंबर २०२२ रोजी रात्री महाआरती नंतर लगेचच ठिक ७:३० वाजता, श्री कामाक्षा माता गोंधळी कला संच कारंजा, श्री ज्ञानेश्वर विठ्ठलराव कडोळे यांचा षष्ठीच्या जोगव्याचा कार्यक्रम ; आश्विन शुद्ध सप्तमी रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ९:०० वाजता, महाअष्टमी निमित्त होमहवन(यज्ञ), पूर्णाहुती व दिपमाळ प्रज्वलन कार्यक्रम तथा मध्यरात्री १२ः०० वाजता, होमहवनाची महाआरती होईल. आश्विन शुद्ध नवमी दि ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी, महानवमीचा नैवेद्य, आश्विन शुद्ध दशमी दि ५ ऑक्टोंबर २०२२ रोजी, सकाळी श्री कामाक्षा देवीचा महाभिषेक, साज शृंगार, सिमोल्लंघन होईल. शनिवार दि ८ ऑक्टोंबर २०२२ रोजी पोर्णिमा व ९ ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागिरी पोर्णिमा होऊन श्री नवरात्रोत्सवाची सांगता होईल. श्री नवरात्रोत्सवात दररोज दुपारी १२:०० ते सायं.०६ : ०० आणि रात्री ०८:०० ते १० : ०० वाजेपर्यंत विविध भजनीमंडळांचे भजनाचे कार्यक्रम तसेच ब्रम्हवृंद, पुजारी , गोंधळी व भक्तमंडळी कडून दररोज दुपारी १२:०० व रात्री ०७:०० वाजता सामुहिक महाआरती होईल. तरी जास्तित जास्त मातृशक्ती उपासक भाविक मंडळीनी लाभ घेण्याचे आवाहन, श्री कामाक्षा देवी संस्थान कारंजा कडून करण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 422