सामाजिक न्यायाचे प्रणेते, सामाजिक परिवर्तनाचे उद्गाते, कृषी क्रांतीचे अग्रदूत, शेतकर्याचे व कष्टकऱ्यांचे कैवारी,लोकनेते,शिक्षण महर्षी, कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...
ज्ञानाची गंगा विदर्भाच्या शहरी व ग्रामीण भागात विदर्भ भूमीत फिरवणारा "ज्ञान पंढरीचा वारकरी" शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या थोर शैक्षणिक कार्याचे अमर शिल्प या रूपाने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारी "श्री शिवाजी शिक्षण संस्था" महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे.शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डिसेंबर १८98 साली अमरावती जिल्ह्यातील पापाळ या खेडेगावात झाला.वडिल शामरावबापू आणि आई राधाबाई यांच्या संस्कारात वाढलेले रत्न म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख.भाऊसाहेबांचे प्राथमिक शिक्षण पापळ येथे झाले. हिंदू हायस्कूल कारंजा लाड येथे माध्यमिक शिक्षण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी झाले.15 ऑगस्ट 1920 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून ते 1921 झाली बॅरिस्टर झाले 25 जानेवारी 1925 मध्ये "वेदवाड्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास" या विषयांवर त्यांनी डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. समाजाच्या उध्दाराकरीता गाडगे महाराजांनी त्यांचे साधन म्हणून "झाडू" हाती घेतला तसेच भाऊसाहेबांनी साधन म्हणून "शिक्षण" महत्त्वाचे मानले. 1926 मध्ये ब्रम्हानंद वसतीगृहाचीस्थापना केली. भाऊसाहेबांनी1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली व संघाच्या प्रचारासाठी महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र चालविले. 28 ऑगस्ट 1927 मध्ये अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह केला.1930 शिक्षण कृषी सहकार खात्याचे मंत्री झाले.1931-32 मध्ये भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची ज्ञानाज्योत चेतवली. डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी जन माणसाला युगायुगांच्या अज्ञान, अंधश्रद्धा,अन् दारिद्र्याच्या शृंखलेतून मुक्त करणारा प्रकाश मार्ग दाखविला.मृतवत, अचेतन बहुजनांच्या ओंजळीत चैतन्याची शुभ्र फुले ठेवली. 1936च्या निवडणूकी पश्चात भाऊ साहेब शिक्षण मंत्री झाले. धनदौलत,वैभव-समृद्धी, मान-सन्मान खुणावीत असताना केवळ आणि केवळ लोककल्याणासाठी बहुजनांच्या उद्धारासाठी त्याकडे पाठ फिरवून त्यांनी काट्याची वाट तुडविली.जनहितार्थ त्यांनी सर्वदूर केवळ संस्थाचे जाळे विणले नाही तर त्या सुरळीत चालाव्यात म्हणून प्रसंगी स्वतःचा राहता वाडा गहाण ठेवला.विद्यारुपी अमृत प्रत्येक बहुजनाच्या तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचावे याकरिता भाऊसाहेबांनी रात्रीचा दिवस,हाडांची काड,अन् रक्ताचे पाणी करणारे ते कर्मयोगी होते. खेड्यापाड्यात ज्ञानाची गंगा पोहचविणारे शिक्षण महर्षी वकिलीचा कोट खुंटिला टांगुन विद्यार्थ्यांची ज्ञान पिपासा शमविणारे ते ज्ञानयोगी होतं.विदर्भात श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा भाऊसाहेबांनी ज्ञानमंदिराचा पाया रचला.म्हणून म्हणावेसे वाटते.. ज्याप्रमाणे भक्तीसंप्रदायाचा पाया..
"नामदेवे रचियेला पाया, तुका झालासे कळस" त्याप्रमाणे.. शिक्षण रुपी इमारतीचा पाया.. "महात्मा फुले रचियेला पाया.. भाऊसाहेब झालासे कळस" "इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी" या वचनाप्रमाणे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे वेलीत रूपांतरित होऊन गगनाला टेकले आहे.पुणे येथे 1950साली लोकविद्यापीठाची स्थापना केली ,त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.1952 मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषिमंत्री झाले. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी.1955 साली भाऊसाहेब देशमुखांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली.त्याच्यात विद्यमाने राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली.त्यांच्या अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य व शिक्षण या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात याकरिता त्यांनी विविध योजना राबविल्या. 1956 साली अखिल भारतीय दलीत संघाची स्थापना केली. 1959 यावर्षी जागतिक कृषक प्रदर्शनीचे दिल्लीत आयोजन केले.भारतीय घटक राज्यातील कृषक मंडळाचे नेते म्हणून रशियास गेले.एका वर्षात सात महाविद्यालय स्थापण्याचा जागतिक विक्रम व अपूर्व चमत्कार भाऊसाहेबांनी घडविला. त्यांच्याच नावाने अकोला येथे कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.त्यांच्या विक्रमी कार्याबद्दल महाराष्ट्राचे तत्कालीन लोकप्रिय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली *हिरक* महोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा मोठ्या थाटात पार पडला."भूतकाळ विसरा, तलवार विसरा,जातीभेद पुरा,सेवाभाव धरा" हे ब्रिद वाक्य असणार्या भाऊ साहेबांचे निधन १०एप्रिल1965 रोजी रामनवमीच्या रात्री ११:३० वाजता दिल्ली येथे झाले.अशा या ज्ञानपंढरीच्या वारकऱ्याला अख्या महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा!!
लेखक -
प्रा.विशाल विजय कोरडे
संस्थापक अध्यक्ष , दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व
सहाय्यक प्राध्यापक , श्री शिवाजी कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला .
दूरध्वनी - ०९४२३६५००९०
आपल्या प्रतिक्रिया द्या....