अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर निरंतर राबवले जात आहेत.२७ जून रोजी दिव्यांगांचे प्रेरणास्थान डॉ. हेलन केलर यांची जयंती संपूर्ण विश्वात साजरी केली जाते. गेल्या १५ वर्षापासून प्रा. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. हेलन केलर जयंती उत्सव अकोला जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्त वर्ग दहावी व बारावी मध्ये यश संपादन केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज २७ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजता जागृती विद्यालय, रणपिसे नगर, अकोला येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाचक व लेखनिक म्हणून कार्य करणाऱ्या लुईस ब्रेल वाचक लेखनिक बँकेच्या सदस्यांचा सत्कार केला जाणार आहे. प्रस्तुत कार्यक्रमात जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंडे, भारती शेंडे, प्रा. अरविंद देव, ॲड. विलासभाऊ वखरे सचिव जागृती शिक्षण प्रसारक संस्था. मुख्याध्यापक अरुण राऊत व प्रा. विशाल कोरडे यांची उपस्थिती लाभणार आहे. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला. रोटरी क्लब अकोला पूर्व व जागृती विद्यालय अकोला तर्फे आयोजित या कार्यक्रमात जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रसाद झाडे, अनामिका देशपांडे, कीर्ती मिश्रा व स्वाती झुनझुनवाला यांनी केले आहे.