आपसी वाटणीपत्राचा निवाडा करण्यासाठी देवळी येथील नायब तहसीलदार किशोर शेंडे (51) याला स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी 3 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक केली.ही कारवाई आज मंगळवार 1 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास देवळी तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवळी तालुक्यातील बोरगाव येथील तक्रारदाराचे आपसी वाटणीपत्राचे प्रकरण नायब तहसीलदारांकडे होते.
त्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी नायब तहसीलदार शेंडे याने तक्रारदाराकडे 5 हजाराची मागणी केली होती. तक्रारदाराने 3 हजार रुपये देण्याचे कबुल केले. ठरल्याप्रमाणे आज 3 हजाराची लाच घेत असताना सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी शेंडे याला ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभय आष्टीकर यांच्या मार्गदर्शनात संदीप मुफडे, संतोष बावनकुळे, कैलास वालदे, प्रितम इंगळे, निलेश महाजन व प्रशांत मानकर यांनी केली.