वाशिम : सद्यस्थितीत परतीचा पाऊस सुरु असून अरबी समुद्रापासून आजूबाजूच्या किनारपट्टी पर्यंत वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून चक्राकार वारे वहात आहेत.त्यामुळे राज्यावर अतिवृष्टी पावसाचे ढग दिसत असून त्याचाच परिणाम म्हणून, राज्यात ढगफुटी सदृश्य पावसाचे संकट घोंघावत आहे.त्यामुळे आश्विन शुद्ध प्रतिपदा दि.२२ सप्टेंबर २०२५ सोमवारी किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,पूर्व विदर्भ झाडीपट्टी, देशपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे आमचे मित्र हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ पाटील गावंडे यांनी सांगितल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे. गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी सोमवारी सकाळी काही प्रमाणात आणि दुपारी ०४:०० नंतर राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. तर अन्यत्र रिमझिम पाऊस बरसणार आहे. अकोला अमरावती वाशिम यवतमाळ जिल्ह्यातही पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात चक्रीवादळ होण्याची भिती वाटत असून, विजा पडण्याची सुद्धा संभावना दिसत आहे.शिवाय वादळी पावसामुळे विद्युत तारा तुटण्याची शक्यता गृहीत धरून विज वितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडीत होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांनी सतर्क रहावे . यामध्ये महत्वाचे सांगायचे म्हणजे आदिशक्ती जगदंबेच्या आगमनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यामध्ये पाऊस येणार असल्याने, सार्वजनिक नवदुर्गा स्थापन करणाऱ्यांनी आगमन मिरवणूक काढतांना जास्तित जास्त दक्षता घ्यावी.असे आवाहन करण्यात आले आहे.