यंदाच्या नवरात्रोत्सवातही मुसळधार पाऊस ; नवदुर्गोत्सव मंडळं आणि मातृशक्ती उपासकांनी दक्षता घ्यावी. पाऊस प्रारंभ.
वाशिम : एकंदरीत पर्यावरण व हवामानाच्या अभ्यासानुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आणि वारंवार धडकणाऱ्या मोठमोठ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांना पोषक वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रावर मोठमोठे पावसाळी ढगांची निर्मिती होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी,काही भागात गडगडाटी,वादळी,मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.पूर्व विदर्भासाठी पुढील पंधरा दिवस पाऊस होणार असल्याची शक्यता असून सप्टेंबर २०२५ अखेर पर्यंत दररोज दिवस बदलवून, काळवेळ बदलवून रात्री बेरात्री बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचे अंदाज सांगण्यात येत आहेत.त्यानुसार विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात चालू आठवड्यात दररोज कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. दि. १४ ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत रात्रंदिवस,काळ वेळ बदलून पाऊस होण्याची शक्यता असून, त्यापुढेही ऑक्टोंबर मध्ये राज्याच्या काही भागात दिवाळी सणामध्ये पावसाचे अंदाज आहेत. सप्टेंबर अखेर पर्यंत ऊन सावली प्रमाणे कोठे रिमझिम तर कोठे शिंतोडे पडतील.अशा पद्धतीने पावसाची बरसात राहणारच आहे.ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी पावसा विषयी आधिक माहिती देतांना सांगीतले की,संपूर्ण पितृपक्ष आणि नवरात्राच्या दिवसात नवदुर्गा उत्सव सुरू असतांना, भाग बदलवून कमी जास्त किंवा बारिक सारीक रिमझीम पाऊस होणार असून काही ठिकाणी आकाश स्वच्छ दिसत असतांना भर उन्हात अचानकपणे मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे विशेषतः खेड्यापाड्याच्या ग्रामिण भागातील मातृशक्ती उपासकांनी शक्यतोवर नवदुर्गा स्थापनेसाठी पक्क्या सभागृहाची निवड करावी किंवा श्री नवदुर्गाचे मंडप पक्के तयार करून त्यावर ताडपत्री किंवा टिनपत्र्याचे शेड घ्यावे. तसेच दुपार नंतर पावसाची शक्यता गृहीत धरून महाप्रसाद व भंडाऱ्याचे कार्यक्रम किंवा जेवणावळ्या रात्री न ठेवता दिवसा दुपार पूर्वीच ठेवाव्यात. सर्वजनिक कार्यक्रम उघड्यावर न घेता सभागृहात घ्यावे.या पावसामुळे काही भागात नदी नाल्यांना,पांदण रस्त्यांना पूर येणार असून,धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.शिवाय अनेक ठिकाणी चक्रीवादळे, सोसाट्याचा वारा,ढगांचे विचित्र गडगडाट होऊन विजा पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या काळात शेतकरी व ग्रामस्थांनी आपली,कुटुंबाची,गुराढोरांची व घरादाराची काळजी घेण्याची गरज आहे. पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले की, सध्या जोरदार पाऊस पडत असूनही, हवेतील उष्णता वाढत असून,श्रमिकांचे अंगातून घामाच्या धारा वहात आहेत.थंडीची सुरुवात पुढील ऑक्टोंबरच्या मध्या शिवाय होणार नसल्याचेही त्यांनी कळवीले आहे.