चंद्रपूर, दि.2 : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2025-26 करीता तेल काढणी युनिट (10 टन क्षमता), , तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि उपकरणे तसेच तेलबिया प्रक्रिया युनिट (प्रमुख आणि दुय्यम तेलबिया) या घटकाचे जिल्ह्यास लक्षांक प्राप्त आहे. यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल 9 लक्ष 90 हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.
ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके घेतली जातात, तथापि तेल काढणी युनिटची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी तेल काढणी युनिट स्थापन करता येईल. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार CIPHET. लुधियाना व यासारख्या इतर केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या Mini Oil Mill/Oil Expeller ची उत्पादकनिहाय तेलघाणा मॉडेलला सदरील अनुदान अनुज्ञेय राहील. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून या घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ/कंपनी इच्छुक अर्जदार संस्थेने केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडारण योजना/नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहील.
तालुका कृषि अधिकारी यांनी अशा अर्जदारांचे अर्ज पूर्वसंमतीकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे 15 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.