वाशिम - तात्पुरती पेंशन न देता नियमित पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी रिसोड नगर परिषदेतील सेवानिवृत्त शिपाई सुर्यभान भगवान घोडे यांनी १५ मे ला जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देवून कार्यवाही न झाल्यास येत्या २१ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात नमूद आहे की, सूर्यभान घोडे हे जूनी जिल्हा परिषद परिसरात राहत असून वर्ष २०१३ रोजी ते नगर परिषद रिसोड येथे शिपाई पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. न.प.कडून त्यांना २८ महिन्याचे वेतन मिळाले नाही. तर त्यांना तात्पुरती पेंशन सुरु करण्यात आली आहे. न.प.कडून त्यांना अद्याप सेवापुस्तिका सुध्दा मिळाली नाही. याबाबत न.प. मुख्याधिकारी यांना तोंडी व लेखी तक्रारी दिल्यानंतर अनेकवेळा त्यांना नगर परिषद कार्यालयातुन काढून दिल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कार्यालयातील इतर अधिकारी हे मुख्याधिकार्यांची दिशाभूल करुन मला न्याय मिळू देत नसल्यामुळे या लोकांपासून माझ्या जिवाला धोका असल्याचेही घोडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे मला २८ महिन्याचे प्रलंबित वेतन व नियमित पेन्शन न मिळत असल्यामुळे माझी उपासमार सुरु असून याबाबत न्याय न मिळाल्यास येत्या २१ मे रोजी न.प. कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा घोडे यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.