वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : शासनाच्या दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आहे.त्या योजनांची माहिती यंत्रणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग बांधवांना देवून त्या योजनेचा लाभ घेण्यास त्यांना प्रोत्साहित करावे.संजय गांधी निराधार योजना व घरकुल योजना यासारख्या योजनांच्या लाभापासून दिव्यांग बांधव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. असे निर्देश दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक दिव्यांगाचे कैवारी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
आज 4 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हयातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणांच्या आढावा सभेत बच्चुभाऊ कडू बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल कावरखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दिगांबर लोखंडे,माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्याम गोरे,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बच्चुभाऊ कडू म्हणाले,सर्व यंत्रणांनी दिव्यांगांसाठी टिमवर्क म्हणून काम केले पाहिजे. जिल्हयातील दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांची कार्यशाळा घेण्यात यावी.तसेच गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील कार्यशाळा घेण्यात यावी.त्यामुळे प्रभावीपणे दिव्यांगाना योजनांचा लाभ देता येईल.काही दिव्यांगांना वेळेत उपचार मिळाले तर ते दिव्यांगावरसुध्दा मात करु शकतात.त्यामुळे आरोग्य विभागाने अशा दिव्यांगांवर वेळीच उपचार केले पाहिजे. गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी आपण ज्या गावामध्ये काम करतो,त्या गावामध्ये असलेल्या दिव्यांगांची माहिती गोळा करुन त्यांना कोणत्या योजनांचा लाभ पाहिजे आहे याची माहिती घ्यावी व त्यांना लाभ देण्याच्या दृष्टिने संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या दिव्यांगाला योजनेचा लाभ मिळवून दयावा.मुळात दिव्यांगत्वच येवू नये यासाठी जन्माला येणारे बालक ही सुदृढ जन्माला येतील यासाठी आरोग्य विभागाने दक्षतेने काम करावे. ज्या व्यक्तीवर दिव्यांगत्व आले आहे त्या व्यक्तीचे दिव्यांगत्व कमी करण्यासाठी त्याला उपचारासाठी मदत करावी.ज्या घरी 3 ते 4 व्यक्ती दिव्यांग असेल अशा घरी सहकार्य करण्याची तयारी यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी ठेवावी. ग्रामपंचायत व नगरपंचायतींना देण्यात आलेला 5 टक्के निधीचा उपयोग पुर्णत: दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. जिल्हयातील कोणताही दिव्यांग लाभार्थी हा घरकुलाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय योजनेचा लाभ दोन महिन्याच्या आत दिव्यांगाना मिळाला पाहिजे. तसेच दिव्यांगांना युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र वेळेत देण्याचे नियोजन करावे. असे ते यावेळी म्हणाले.
सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसिलदार,सर्व गटविकास अधिकारी,सर्व नगरपरिषद व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालया कडून मिळाल्याचे वृत्त संजय कडोळे यांनी कळवीले आहे.