लग्नानंतर अवघ्या २१ दिवसात पती आवडत नसल्याने पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे आधी पत्नीने पतीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव केला होता मात्र मृतकाच्या आईला संशय येताच चौकशीअंती सत्य उघडकीस आले आहे.
पांडुरंग चव्हाण असे मृतक पतीचे नाव आहे तर शीतल चव्हाण असे संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे.
एका महिन्यापूर्वी शीतल आणि पांडुरंग यांचा विवाह झाला होता. मात्र शीतल आपल्या पतीपासून खुश नसल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या पतीचाच गळा दाबून हत्या केली.
मात्र पांडुरंग यांना हृदयविकाराचा झटका आला. असे सांगत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान अचानक त्याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी गेवराई पोलिस ठाण्यामध्ये त्याच्या पत्नीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. संशयावरून पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले होते. कसून चौकशी केल्यानंतर तिने हत्येची कबुली दिली आहे. परंतु, स्वत: गळा दाबून हत्या केली आणि हृदयविकारानेच त्यांचा मृत्यू झाला असा बनाव करण्यात आला होता. परंतु, अवघ्या आठ दिवसाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पत्नीनेच खून केल्याचे उघड केले. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी शीतलवर पांडुरंग चव्हाण यांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.