वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत, वृद्ध साहित्यीक कलाकारांचा,राज्य शासनाकडून महासम्मान म्हणून त्यांच्या वृद्धापकालीन उदरनिर्वाह व औषधोपचाराकरीता "राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना" चालविल्या जाते. सद्यस्थितीत लाभार्थ्यांना ह्या योजनेद्वारे दरमहा पाच हजार मानधन देण्यात येते. परंतु गेल्या जुलै आणि ऑगष्ट अशा दोन महिन्यांचे मानधन लाभार्थ्यांना मिळाले नसल्याने, मानधनावर अवलंबून असणाऱ्या निराधार वयोवृद्धाची अक्षरशः उपासमार होत आहे. तरी मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री महोदयांनी ह्याकडे लक्ष्य देवून लवकरात लवकर लाभार्थी लोककलाकारांना मानधन मिळवून देण्याची मागणी वृद्ध कलाकाराकडून होत आहे.तसेच गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेले वृद्ध साहित्यिक कलाकाराच्या पात्र लाभार्थ्यांचे पात्र अर्ज,मार्च 2024 मध्ये माननिय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खालील निवड समितीने मंजूर करून, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम यांचे कडून,सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांचेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ह्या नव्याने मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात मानधन जमा होणे अपेक्षित होते.तरी माननिय संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून वयोवृद्ध साहित्यीक व कलाकाराची हेळसांड होऊ न देता त्यांचे बँक खात्यात डीबीटी (थेट हस्तांतरण प्रणालीद्वारे)अविलंब मानधन पाठविण्याची मागणी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत संजय मधुकरराव कडोळे यांनी केली आहे.