कारंजा : सार्वजनिक सण-उत्सव-त्यौहार-यात्रा-मिरवणूक म्हटली तर, गरीब श्रीमंता पासून, महिला मंडळी,आबाल वृद्ध, तरुण मंडळी, सर्व जाती धर्माचे, विविध राजकिय पक्षाचे आणि महत्वाचे म्हणजे हौसे-गवसे-नवसे एकत्र येत असतात. अशावेळी सामाजिक राजकिय कार्यकर्ते निःस्वार्थपणे शांती - सलोखा-बंधुभाव-सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रिय एकात्मता राखण्याचे प्रयत्न करीत असतात. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी ज्यावेळी सण उत्सव मिरवणूकीमध्ये आपले कर्तव्य बजावत असतात. त्यावेळी शासन त्यांना वेतन-भत्ते देत असते. मात्र सामाजिक कार्यकर्ते- राजकिय कार्यकर्ते स्वतःची जबाबदारी समजून निस्वार्थ पणाने आपले कर्तव्य बजावीत असतात. तेव्हा अशा कार्यप्रसंगी सामाजिक आणि राजकिय कार्यकर्ते यांचा सन्मान ठेवणे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्याचे सुद्धा आद्य कर्तव्य असते. त्याकरीता सण-उत्सव- मिरवणूकापूर्वी प्रशासनाने सर्वांची ओळख करून घेणे, त्यांना ओळखपत्र प्रदान करणे आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान करणे आपले कर्तव्य ठरते. म्हणजेच सण-उत्सव-मिरवणूका, निर्विघ्नपणे पार पाडण्यास मदत होते. शिवाय चुका ह्या प्रत्येकाकडूनच होत असतात. त्यामुळे आपल्या चुका आपणच ओळखून राजकिय किंवा सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी शांतता व संयम राखणे सुद्धा गरजेचे असते. असे मनोगत महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष तसेच ज्येष्ठ समाजसेवकसंजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.